मूल्यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत. मुलांमध्ये चारित्र्य, शील यांची जाणीव निर्माण व्हावी. तसेच संस्कार त्यांच्या मनावर व्हावेत. त्यांना शिस्त लागावी अशी अपेक्षा शाळांकडून समाजाने केली, तर ती योग्यच आहे.
अभ्यासक्रम, पाठय़पुस्तकांचे अध्यापन, परीक्षा निकालपत्रे इत्यादी चाकोरीच्या पलीकडेही शिक्षण आहे. विद्यार्थ्यांवर संस्कार करणे हेही महत्त्वाचे आहे. हे संस्कार शाळेकडून, शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाकडून व्हायला हवेत. आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून बाहेर पडलेले विद्यार्थी नम्र, शीलसंपन्न, शिस्तगीर, सभ्य, सुसंस्कृत, हुशार, चौकस, स्वावलंबी, शोधबुद्धी विकसीत झालेले असायला हवेत; अशी अपेक्षा समाजाने केली तर त्यात चूक नाही.
त्यासाठी ‘मूल्यशिक्षण’ अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘नैतीक शिक्षण’ असेही, त्याला म्हणता येईल. ‘मूल्यांचे शिक्षण’ या संदर्भात भरपूर विचार होऊनही त्याबद्दल प्रभावी, योजनाबद्ध आणि दीर्घकालीन अंमलबजावणी कमीच झालेली दिसते. खरे तर, ‘मूल्यशिक्षण’ किंवा ‘नैतिक शिक्षण’ याला दीर्घ अशी परंपरा आहे. पूर्वीच्या काळी गुरूगृहातून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱया विद्यार्थ्याला श्री गुरू सांगत,‘सत्यं वद्। धर्मं चर। स्वाध्यायात् मा प्रमदितव्यम्। मातृदेवो भव। पितृ देवो भव। आचार्य देवो भव।…’ अशाच अनेक प्रार्थना आपल्या संस्कृतीचा भाग आहेत. आमचे अध्ययन आम्हाला तेजस्वी करणारे असावे. आमच्याकडून एकमेकांचा द्वेष न घडो या प्रार्थनाप्रेरीत आचरणातून मुलांवर, समाजावर संस्कार होत आला आहे.
आपल्या परंपरेत अकरा व्रते सांगितली आहेत. 1) अहिंसा, 2) सत्य, 3) चोरी न करणे, 4) ब्रह्मचर्य, 5) संपत्तीचा (अकारण वाजवीपेक्षा अधिक) संग्रह न करणे, 6) शरीरश्रम करणे, 7) कार्याची गोडी, 8) निर्भय वृत्ती, 9) सर्व धर्म समान मानणे, 10) स्वदेशी, आणि 11) अस्पृश्यता नष्ट करणे.
संत ज्ञानेश्वरांचे ‘पसायदान’, संतश्रे÷ तुकारामांचे विविध अभंग यातूनही विविध विचारांचे संस्कार आपल्यावर झालेले आढळतात.
विविध आयोगांनी शिक्षणातील ‘नैतिकतेचा’ आग्रह धरलेला दिसून येतो. इतरांकरिता किंवा श्रे÷ उदात्त कारणांकरिता कल्याण बुद्धीने व स्वार्थरहित वृत्तीने जे त्यागाची प्रेरणा देते ते आध्यात्मिक मूल्य होय.
‘मूल्य’ या शब्दाचा शब्दश: अर्थ ‘किंमत’ असा आहे. एखाद्या वस्तूचे मूल्य 10 रु. आहे असे आपण वर्णन करतो. परंतु, ‘मूल्यशिक्षण’, ‘नैतिक मूल्य’, ‘जीवनमूल्य’ या शब्दामधील ‘मूल्य’ या शब्दांना विशेष अर्थ आहे. आपल्या जीवनाची अशी आधारभूत तत्त्वे किंवा विचार की ज्यांच्यासाठी आपण जगतो, प्रसंगी स्वत:ला पणाला लावतो, ज्यांचे सातत्याने, दीर्घकाल आचरण करतो.
आचरण हीच मूल्यविचारांची कसोटी आहे. ज्यांच्याकडून उच्च विचार किंवा मूल्ये शब्दांनी सांगितली जातात. पण त्यांच्या आचरणात मात्र ती नसतात, अशा व्यक्तींच्या ‘उपदेशाला’ अर्थ उरत नाही. म्हणून संस्कार करणाऱया, मूल्य शिक्षण देणाऱया व्यक्तीचे आचरण फारच महत्त्वाचे असते. आई, वडील, शिक्षक, मुख्याध्यापक हे मुलांवर विविध मूल्यांचे संस्कार करतात. त्यांचे आचरण जर त्या मूल्यांप्रमाणे असेल तो संस्कार मुलांच्या मनावर खोल उमटतो.
अनेकदा आपल्या सामाजिक परिस्थितीचा संदर्भ देऊन सांगितले जाते की, मूल्यशिक्षण फारच आवश्यक आहे. समाजातील भ्रष्टाचार, ढोंगीपणा, अंधश्रद्धा, अनाचार, असभ्यता, राष्ट्रीय भावनेची उणीव, शिक्षणाबद्दल उदासीनता, वडीलधाऱया माणसांबद्दल अनादर, ज्ञानसंपादन याबद्दल अनास्था इत्यादी अनेक उणिवांबद्दल बोलले जाते.
आपला समाज उदासीन, अर्थासीन, सुखासीन आणि स्पर्धासीन होत चालला आहे. म्हणूनही ‘मूल्यशिक्षणा’ची गरज सांगितली जाते. हे सर्व खरेच आहे. पण सर्व काळात व सर्व समाजघटकांसाठी नैतिकतेची गरज असते; हेही लक्षात ठेवले पाहिजे.









