महात्मा गांधीही ‘ब्रिटीशांचे आपण नोकर’ असल्याचा करत असत उल्लेख
मुंबई / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ब्रिटीशांसमोर झुकून त्यांची क्षमा मागितली होती, असा आरोप काँगेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. महाराष्ट्रातील अकोला येथे त्यांच्या पदयात्रा आलेली असताना त्यांनी जाहीर सभेत हा आरोप केला. यासंबंधींची काही कागदपत्रे त्यांनी सभेत दाखविली. त्यातील काही वाक्येही वाचून दाखविली. यामुळे सावरकरांची कथित माफी पुन्हा चर्चेत आली. तथापि, आता नेहरुंचाही माफीनामा आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या पत्रात केलेला उल्लेख भाजपने प्रसिद्ध केल्याने काँगेसची कोंडी होण्याची शक्यता आहे.
नेहरु यांना काही कारणांमुळे 14 दिवसांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तथापि, नेहरुंचे पिता मोतीलाल यांनी ब्रिटीशांची मनधरणी करुन नेहरुंची सुटका करण्यासाठी गळ घातली. नेहरुंनीही ब्रिटीशांकडे क्षमायाचना करुन त्या 14 दिवसांच्या कारावासाच्या शिक्षेतून आपली सुटका करुन घेतली, हे दर्शविणारी कागदपत्रे भाजपकडून प्रसिद्ध करण्यात आली आहेत.
नेहरु यांना ‘नाभा’ कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली होती. केलेल्या कृत्यांचा यापैकी एकाच व्यक्तीवर टाकून नेहरु आणि त्यांचे आणखी दोन मित्र यांनी ब्रिटीशांकडे माफी मागितली आणि स्वतःची सुटका करुन घेतली अशी माहिती भाजपने प्रसिद्ध केली आहे. नेहरुंच्या आत्मचरित्रातही या घटनेचा उल्लेख असल्याचे भाजपने दर्शवून दिले आहे.
महात्मा गांधींवरही आरोप
महात्मा गांधी यांनीही ब्रिटीश उच्चाधिकारी लॉर्ड चेम्सफर्ड आणि डय़ूक ऑफ कॅनॉट यांना एक पत्र पाठविले होते. त्यात त्यांनी शेवटी युवर एक्सलन्सिज ओबिडियंट सर्व्हंट एम. के. गांधी (आपला सर्वात आज्ञाधारक नोकर एम. के. गांधी) असे नमूद करुन त्याखाली स्वाक्षरी केली होती. हे पत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले आहे. यावरुन, गांधीही ब्रिटीशांचे विश्वासू नोकर आहेत, असे म्हणायचे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
प्रकरण काँगेसच्या अंगलट येणार ?
राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंबंधी बेजबाबदार वक्तव्य करुन एका नव्या वादाला जन्म दिला आहे. आता भाजपकडून काँगेस नेते कसे ब्रिटीशांचे अंकित होते याची कागदपत्रे प्रसिद्ध केली जात आहेत. त्यामुळे अखेरीस काँगेसचीच कोंडी होऊन अशी शक्यता व्यक्त होत आहे.
इंदिरा गांधी, मनमोहनसिंग यांच्याकडून प्रशंसा
दिवंगत पंतप्रधान आणि राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सावरकरांची प्रशंसा केलेली आहे. इंदिरा गांधी यांनी सावरकरांचा उल्लेख ब्रिटीशांविरोधात निडरपणे लढणारा भारताचा सुपुत्र असा केला आहे. मनमोहनसिंग यांनीही त्यांना स्वातंत्र्ययोद्धे मानले होते. राहुल गांधींना आपली आजी आणि माजी पंतप्रधान यांनी केलेली सावरकरांची प्रशंसाही मान्य नाही का, असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.









