एपीएमसी पोलिसांच्या दिले ताब्यात, पावने दोन किलो गांजा जप्त
प्रतिनिधी/ बेळगाव
दुसरा क्रॉस, नेहरुनगर येथील एका भाडय़ाच्या घरात गांजा विकणाऱया दोघा जणांना स्थानिक नागरिकांनी पकडले आहे. शनिवारी दुपारी ही घटना घडली असून त्यांच्या जवळून 1 किलो 800 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या दोघा जणांवर एपीएमसी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
निकाब उर्फ निक्या दस्तगीरसाब पिरजादे (वय 46), नियाज शफीअहम्मद नाईकवाडी (वय 38, दोघेही रा. अशोकनगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी झाला आहे. या टोळक्मयाने फळे ठेवण्यासाठी म्हणून दुसऱया क्रॉसवर एक घर भाडय़ाने घेतले होते. मात्र त्या घराचा वापर फळे ठेवण्यासाठी केला नाही. उलट अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी त्यांनी अड्डा थाटला होता.

शनिवारी दुपारी नेहरुनगर येथील स्थानिक कार्यकर्त्यांना याची कुणकुण लागली. थेट या कार्यकर्त्यांनी घराचा दरवाजा ठोठावून त्यांना बाहेर बोलाविले. लोकवस्तीत गांजा विकून या परिसराचे नाव का खराब करता? असा जाब विचारला. त्यावेळी निकाब व नियाज या दोघांची बोलती बंद झाली. आम्ही गांजा विकत नाही. कर्फ्यु असल्यामुळे मद्यपान करीत बसलो असल्याचे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
खोलीत गांजाच्या पुडय़ा आढळून येताच कार्यकर्त्यांनी एपीएमसी पोलिसांना घटनास्थळी पाचारण केले. पोलिसांनी या दोघा जणांना ताब्यात घेऊन भाडय़ाच्या खोलीत शोध मोहीम राबविली असता 1 किलो 800 ग्रॅम इतका गांजा आढळून आला. या जोडगोळीजवळून एक मोटार सायकलही जप्त करण्यात आली आहे. त्यांचा आणखी एक साथीदार फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.









