केरळ प्रदेश काँगेस समितीच्या अध्यक्षांचे वादग्रस्त विधान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी धर्मांध शक्तींशी तडजोड करण्यासही मागेपुढे पाहिले नाही, अशी वादग्रस्त टिप्पणी केरळ प्रदेश काँगेस समितीचे अध्यक्ष आणि काँगेसचे खासदार के. सुधाकरन यांनी केली आहे. त्यामुळे काँगेसचीच मोठी कोंडी झाली असून पक्षाने हात झटकले आहेत.
जवाहरलाल नेहरु यांनी त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात रा. स्व. संघाच्या डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांनाही स्थान दिले होते. श्यामाप्रसाद मुखर्जी हे फासिस्ट आणि धर्मांध तत्वज्ञानाचे पुरस्कर्ते होते. मात्र, तसे असूनही नेहरुंनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिले, असे विधान करून त्यांनी एक प्रकारे नेहरुंच्या धर्मनिरपेक्षतेवरच प्रश्नचिन्ह उमटविले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
सुधाकरन यांनी त्यांचे हे वादग्रस्त विचार नेहरुंच्या जयंतीदिवशीच व्यक्त केल्याने अधिकच वाद निर्माण झाला आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी आणखी एक विधान करून वाद ओढवून घेतला होता. सुधाकरन स्वतः काँगेसचे विद्यार्थी नेते असताना त्यांनी कम्युनिस्ट सरकारपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांचे संरक्षण केले होते, असे त्यांचे म्हणणे होते. संघाने त्यांच्या या विधानाचा इन्कार केला होता. मात्र, सुधारकन त्यांच्या विधानावर ठाम होते.
अप्रत्यक्ष टीका
सुधारकरन यांनी नेहरुंवर केलेली ही टीका अप्रत्यक्ष स्वरुपाची आणि छुपी आहे. नेहरु अत्यंत उदार मनाचे होते म्हणून त्यांनी धर्मांध शक्तींशी तडजोड केली आणि मुखर्जींना मंत्रिपद दिले, असे त्यांनी काँगेसच्या एका कार्यक्रमात कार्यकर्त्यांसमोर भाषण करताना म्हटले होते. मात्र, त्यांच्या अशा वक्तव्याने मोठाच वाद निर्माण झाला असून काँगेसलाही सारवासारवी करावी लागली आहे.
श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्वतंत्र भारताच्या प्रथम मंत्रिमंडळात व्यापार आणि उद्योग मंत्री म्हणून 1947 ते 1950 अशी 3 वर्षे काम केले होते. नंतर काश्मीर प्रश्नासंबंधी नेहरुंचे धोरण न पटल्याने त्यांनी मंत्रिपद सोडून भारतीय जनसंघाची स्थापना केली होती. जनसंघाचेच रुपांतर नंतर भारतीय जनता पक्षात झाले. त्यामुळे डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी हे भाजपचे ‘संस्थापक’ मानले जातात.









