अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार, 26 जुलै 2021, स. 11.00
● रविवारी अहवालात 586 बाधित ● एकूण 8,969 जणांची तपासणी ● जगरहाटीला पुन्हा गती● जिल्ह्यात 2,976 बेड रिक्त ● कोरोनामुक्ती, वाढीचे प्रमाण व्यस्त
सातारा / प्रतिनिधी :
गुरुवारी 844, शुक्रवारी 937 तर शनिवारी 704 अशी बाधित वाढीची आकडेवारी 800 च्या पटीत समोर येत आहे. मात्र, रविवारी रात्री नेहमीप्रमाणे बाधित वाढ कमी आली असून, केवळ 586 जणांचा अहवाल बाधित आला. जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून सुरु असलेली आकडेवारीची आलेखाची गणितेही नागरिकांना तोंडपाठ होवू लागली आहेत. पुण्यामुंबईसह जवळपास सांगली, कोल्हापूर सोडता सगळीकडे कोरोना आटोक्यात येवू लागलाय मात्र सातारा जिल्हयातील स्थिती अद्यापही चौथ्या टप्प्यावर रेंगाळत असल्याने सातारा जिल्हय़ातच असे का ? असा सवाल नागरिकांच्या मनात अद्यापही आहे.
586 जणांचा अहवाल बाधित
जिल्हय़ाचा एकूण पॉझिटिव्हीटी दरासह आरटीपीसी तपासणीचा पॉझिटिव्हीटी दर खाली आल्याने जिल्हय़ाची कडक लॉकडाऊनमधून सुटका झालीय. रविवारी रात्रीच्या अहवालात एकूण 8,969 जणांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 586 एवढय़ा जणांचा अहवाल बाधित आला आहे. दर रविवारी पाचशेच्या पट्टीत बाधित वाढीची संख्या येण्याची ही सलग सहावी वेळ आहे. दरम्यान जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर किती याची माहिती अहवालात देण्यात आलेली नाही.
पावसाच्या सरींमध्ये जगरहाटी सुरु
पावसाळय़ापूर्वी लॉकडाऊन असल्याने फक्त अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. व्यापारी, नागरिकांची मागणी लॉकडाऊन उपाय बंदच करा अशी होती. राज्यभरात इतर जिल्हय़ात व्यवहार सुरळीत होत असल्याने सातारा जिल्हय़ातील स्थितीबाबत नागरिकांमध्ये पॅनिक वातावरण होते. मात्र, दोन दिवसांपूर्वीच जिल्हाधिकाऱयांनी लॉकडाऊन शिथील केल्याने जगरहाटी पुन्हा सुरु झाली असली तरी पावसांच्या सरीमध्ये जनजीवन विस्कळीत आहे. मात्र त्यामध्येच आता पुन्हा बाजारपेठांसह काही गोष्टी सायंकाळी 4 पर्यंत सुरु राहणार आहेत.
आता पुन्हा लॉकडाऊन नको रे बाबा
पावसाळय़ापूर्वी शक्यता नागरिक खरेदी करुन ठेवतात. पावसाळय़ात बाहेर पडण्यास मर्यादा असल्याने बाजारपेठांमधील वातावरणही थंडच असते. मात्र, लॉकडाऊन होणार म्हटलं की लोकांची प्रचंड गर्दी बाजारपेठांमध्ये होत होती. त्यातच दुपारपर्यंत वेळ असल्याने बाजारपेठांमधील झुंबड सर्वांनीच अनुभवली आहे. आता वेळेची मर्यादा वाढल्याने गर्दी होणार नाही. त्यातच पावसाळा असल्याने अनेकजण बाहेर पडत नाहीत. प्रशासनाने लॉकडाऊन शिथील केला असला तरी पावसाने मात्र जनजीवन लॉक ठेवलेले आहे. त्यामुळे नागरिकांना आता घरात बसून नियम पाळावे लागणार आहेत. त्यामुळे आता पुन्हा भविष्यात लॉकडाऊन नको रे बाबा अशीच जिल्हावासियांची भावना आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 13,36,823, एकूण बाधित 2,14,071, घरी सोडण्यात आलेले 2,00,680, मृत्यू 5,150, उपचारार्थ रुग्ण 10,577
रविवारी जिल्हय़ात बाधित 704, मुक्त 256, बळी 14