अचूक बातमी “तरुण भारत”ची, रविवार, 1 ऑगस्ट 2021, दु. 12.45
● शनिवारी रात्री अहवालात 675 बाधित ● एकूण 11,577 जणांच्या तपासण्या ● पॉझिटिव्हिटी दराची नोंद नाही ● आकडेवारीतील घोळ सुरूच ● पावसामुळे वायरल इन्फेक्शन वाढले
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेपासून सुरू झालेले बाधित वाढीचे सत्र अद्याप तसेच सुरू आहे. गत दोन महिन्यापासून दर रविवारी वाढीचा वेग मंदावतो, तो 500 ते 600 च्या आसपास रेंगाळतो आणि नंतर सोमवार ते शुक्रवार बाधित वाढ 800 ते 900 च्या पटीत व कधी हजारांच्या आकड्यांमध्ये येतच आहे. हे सत्र कधी थांबणार? असा सवाल लोकांच्या मनात नेहमीप्रमाणेच पडलेला आहे.
शनिवारी अहवालात 675 बाधित
शनिवारी रात्रीच्या अहवालात आलेल्या माहितीनुसार एकूण 11,577 जणांची तपासणी झालेली असून, यापैकी 675 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर किती याची नोंद किंवा उल्लेख नाही.
पावसामुळे वायरल इन्फेक्शन वाढले
गेल्या काही दिवसात सुरू असलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालेला आहे. त्यातच पावसात भेटल्याने सर्दी ताप खोकला झालेले अनेक रुग्ण जिल्ह्यात आहेत व ते त्यांच्या फॅमिली वा खाजगी डॉक्टरकडे तपासणीसाठी जातात. मात्र तिथेच ज्या डॉक्टरकडे रुग्ण सर्दी ताप खोकला याची तक्रार घेऊन जातो. खाजगी दवाखान्यात त्याची सर्व माहिती घेतली जाते व तिथेच संबंधित डॉक्टर्सकडून त्या रुग्णाला औषधे देण्याबरोबरच टेस्ट करून घ्या, असा सल्ला दिला जातो. प्रत्येक ताप हा कोरोना नसतो, घाबरू नका, असे सांगणारे प्रशासन टेस्टिंग कंपल्सरी का करत आहे? असा सवाल नागरिकांना पडलेला आहे. त्यामुळे अनेक जण डॉक्टर्सकडे जाण्यास सुद्धा बिचकत आहेत. उगाच लोकांच्या मनात भीती निर्माण करण्यापेक्षा वास्तवाला भेटण्याची गरज आहे.
आकडेवारीतील घोळ अद्यापही सुरूच
गेल्या काही दिवसात अचानकपणे बाधितांच्या मृत्यूची आकडेवारी ज्याप्रकारे प्रसिद्ध करण्यात येत आहे, ती पाहता लोकांच्या मनात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. एकाच दिवशी एवढे मृत्यू होत असतील तर साहजिकच लोकांच्या मनात भीती निर्माण होणारच मात्र हे देखील सत्य नाही. कारण ज्या ज्या वेळी मोठे आकडे मृत्यूचे देण्यात आले. त्यावेळी त्यामध्ये गेल्या तारखेतील मृतांची नोंद करण्यात आल्यामुळे आकडेवारी फुगलेली आहे. मात्र, हे आरोग्य प्रशासनाने सांगितलेले नाही. त्यामुळे लोकांच्या मनात खरंच कोरोना आहे की नाही किंवा नेमकं काय चाललंय अशी भावना आल्यास ती चुकीची वाटून घेऊ नका. आपत्कालीन स्थितीत लोकांना जगवायचे असतं, तगवायचे असतं याचे भान ठेवण्याची गरज आहे.
शनिवारी जिल्ह्यात बाधित – 842, तपासणी – 12012, मृत्यू – 16, मुक्त – 866
शनिवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने – 14,09,288, एकूण बाधित – 2,19,009, घरी सोडण्यात आलेले – 2,05,518, मृत्यू – 5,297, उपचारार्थ रुग्ण-10,676