अचूक बातमी “तरुण भारत”ची, मंगळवार 17 ऑगस्ट 21, सकाळी 11.15
● जिल्ह्यातील परिस्थिती ‘जैसे थे’च ● एकूण 12,771 जणांची तपासणी ● प्रशासन उरलं माहिती पुरतं ● काळजी घेत जगरहाटी सुरू
सातारा / प्रतिनिधी :
रविवारी रात्रीच्या अहवालात 569 जणांचा अहवाल बाधित आला होता. चला वाढ मंदावली, हुश्श्य…असे म्हणून जगरहाटी सुरू झाली असताना पुन्हा सोमवारी रात्री आलेल्या प्रशासनाच्या अहवालात नेहमीप्रमाणे बाधित वाढ तीन अंकाने समोर आली. यामध्ये एकूण 856 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामध्ये एकूण 12,7 71 जणांची तपासणी करण्यात आलेली आहे. नेहमीप्रमाणे अहवालात प्रशासनाकडून पॉझिटिव्हिटी दर किती याची माहिती देण्यात आलेली नाही नाही.
प्रशासन उरलं माहिती पुरतं…
दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात प्रचंड कहर केला. जिल्हावासियांनी प्रचंड हाल सोसले आणि त्यानंतर जिल्हावासियांच्या उरावर लॉकडाऊन बसला होता. त्यातील आकडेवारीचे खेळ तेव्हापासून जिल्हा पाहत आहे. त्यावर अपलोड घोटाळ्याची मालिका ‘तरुण भारत’ ने प्रसिद्ध करून प्रकाशझोत टाकला होता. प्रशासनाकडून मात्र फार काही सुधारणा झालेली दिसत नाही. त्यामध्ये परवा खटाव तालुक्यात एकाच दिवशी 22 जे मृत्यू दाखवले गेले आहेत ते ही प्रत्यक्षात वेगवेगळ्या दिवशी झालेले आहे. अशी चुकीची माहिती देण्यात प्रशासन उरलेलं आहे, काय असा सवाल नागरिक जिल्हा माहिती कार्यालयाच्या प्रशासनाच्या अधिकृत फेसबुक पेजवर देण्यात येत असलेल्या माहितीच्या पोस्टवर विचारत आहेत. त्यांचे अनेक प्रश्न आहेत कधी तरी प्रशासनाने त्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
काळजी घेत जगरहाटी सुरू पण...
एकीकडे सुरू असलेली व थांबत नसलेली बाधित वाढ. त्यातच डोक्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार जरी बाजूला निघालेली असली तरी आता काळजी घेत जगरहाटी पुन्हा सुरू झालेली आहे. मात्र जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती पाहता आता पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जिल्ह्याच्या स्थितीमध्ये लक्ष घालावे लागणार आहे. कारण गतवेळी तेव्हा जिल्ह्यातील बाधित वाढ थांबत नव्हती तेव्हा ही नेमकी परिस्थिती काय आहे हे पाहण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आले होते त्यांनी आढावा घेतला होता. व त्यानंतर जिल्ह्यात सलग पणे सुरू असलेली तीन अंकी बाधित वाढ थांबलेली नाही. त्यामुळे दादा, पुन्हा एकदा साताऱ्याला धडक द्या म्हणजे स्थिती बदलेल असा आशावाद नागरिक व्यक्त करत आहेत.
बोलायचं आहे त्यांची चुप्पी
वास्तविक जिल्ह्यातील बाधित वाढ आणि मृत्यू सत्र थांबत नाही त्यामुळे नेमकं काय हे शोधण्याचं काम काम करायला हवा त्यावर काय उपाययोजना करता येतील हे पाहायला हवं व त्यावर पालकमंत्री, गृहराज्यमंत्री म्हणून बोलायला हवं ते सर्वजण काहीच बोलत नाहीत. फक्त काळजी घ्या अन्यथा लॉकडाउन एवढा इशारा दिला की कोरोना संसर्ग थांबणार आहे, असे बहुदा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना वाटत आहे की काय ? आणि त्याहून कठीण काम प्रशासनाचे आहे. पूर परिस्थितीला तोंड दिल्यानंतर पावसाचा जोर थांबला आहे मात्र कोरोना थांबण्यास तयार नाही. त्याबाबत पारदर्शकपणे माहिती देणे, उपाययोजना अंमलात आणणे, लोकांना जागृत करणे, लोकांच्या मनातील भीती दूर करणे या गोष्टी करणे आवश्यक असताना जिल्हाधिकारी देखील तोंडावर बोट ठेवून परिस्थिती पहात आहेत.
सोमवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमूने 15,89,235 एकूण बाधित 2,30,798 एकूण कोरोनामुक्त 2,17,578 मृत्यू 5,603 उपचारार्थ रुग्ण 10,153
सोमवारी जिल्हय़ात बाधित 569, मुक्त 1,244 बळी 11