वार्ताहर/ उसगांव
उसगांव येथील नेस्ले इंडिया व हिंदुस्थान फुडस् या दोन्ही कंपन्यांनी कामगारांना बोलावून काम सुरु करण्याचा प्रयत्न केल्याने उसगावातील स्थानिक नागरिकांनी दोन्ही कंपनीच्या गेटसमोर जमून त्याला विरोध केला. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन 14 एप्रिलपर्यंत ही दोन्ही आस्थापने बंद ठेवण्याची मागणीही करण्यात आली.
कोरोनाचा संसर्ग झपाटय़ाने पसरत असून कुणालाही त्याची बाधा होऊ शकते. केंद्र सरकारने लागू केलेला देशव्यापी लॉकडाऊन हाच त्यावर योग्य उपाय आहे. त्याला दोन्ही कंपन्यांनी काम बंद ठेवून सहकार्य करण्याचे आवाहन उसगांववासियांनी केले आहे. सध्य स्थितीत केवळ अत्यावश्यक सेवा पुरविणारी आस्थापने व महत्त्वाची औषधे निर्मिती करणाऱया कंपन्यांना उत्पादन सुरु ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. पण चॉकलेटस्चे उत्पादन करणाऱया नेस्ले व दूध पावडरची निर्मिती करणाऱया हिंदुस्थान फुडस् कंपनीला जिल्हाधिकाऱयांनी कोणत्या आधारावर परवानगी दिली असा प्रश्न स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
कामगारांच्या जीवाशी खेळ
या दोन्ही कंपन्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात कामगारवर्ग आहे. कच्चा माल घेऊन येणारी व तयार माल घेऊन परराज्यात जाणारी वाहने येणार असल्याने एखाद्याच्या निष्काळजीपणामुळे सर्व कामगारांचा जीव धोक्यात येणार आहे. जिल्हाधिकाऱयांनी परवानगी दिल्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी कामगारांना कामावर रुजू होण्याचा आदेश दिला आहे. मात्र कंपनीच्या मुख्य गेटवर कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य खात्याचे डॉक्टर्स किंवा कर्मचारी तैनात केलेले नाहीत. मग कामगारांच्या व या भागात राहणाऱया जनतेच्या जीवाशी सरकार का खेळत आहे, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या आदेशाची पायमल्ली
कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी केंद्र सरकारने लागू केलेल्या देशव्यापी लॉकडाऊनला सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार करीत आहेत. तर दुसऱया बाजूला अत्यावश्यक सेवेत न येणाऱया कंपन्यांना उत्पादनासाठी राज्य सरकार परवानगी देत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये ताळमेळ नसल्याची ही लक्षणे असल्याचा आरोपही स्थानिकांनी केला आहे. नेस्ले कंपनीचे अधिकारी संजय भंडारी यांनी ग्रामस्थांशी चर्चा करताना कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ तर हिंदुस्थान फुडस्च्या अधिकाऱयांनी ग्रामस्थांच्या सहीनिशी वरिष्ठांना निवेदन देण्यास सांगितले.









