पाकिस्तानच्या बेछुट गोळीबारात धारातिर्थी : शनिवारी होणार अत्यंसंस्कार
प्रतिनिधी/ संकेश्वर
जम्मू-काश्मीर सरहद्दीवर झालेल्या बेछुट गोळीबारात नेर्ली (ता. हुक्केरी) येथील जवान चेतन बसगौंडा पाटील (वय 26) हे हुतात्मा झाला. ही घटना बुधवार दि. 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने नेर्ली व हेब्बाळ या गावावर शोककळा पसरली आहे. जवान चेतन यांचे पार्थिव नेर्ली या मूळगावी शनिवारी सकाळी आणण्यात येणार असून दुपारी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी गुरुवारी सायंकाळी दिली.
चेतन हे बुधवारी जम्मू-काश्मीर येथील बारामुल्ला जिल्हय़ातील उरी सेक्टरमध्ये असलेल्या सीमेवर पहारा देत असताना दि. 2 रोजी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अचानक गोळीबारास सुरुवात झाली. पाकिस्तानच्या गोळीबारास उत्तर देत असताना समोरून आलेल्या दोन गोळय़ा चेतनच्या छातीत शिरल्या. यात चेतन गंभीर जखमी होऊन हुतात्मा झाले. हुतात्मा चेतन यांचे पार्थिव जम्मू-काश्मीर येथून विमानाने पुण्यात शुक्रवारी दाखल होणार आहे. शनिवारी सकाळी लष्कराच्या वाहनातून पार्थिव नेर्ली गावात आणण्यात येणार आहे.
आत्याने सांभाळ केला
माजी सैनिक कै. बसगौडा पाटील यांना चेतन व दयानंद हे दोन पुत्र आहेत. चेतन व दयानंद हे दोघेही बालवयात असतानाच त्यांच्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले. यामुळे वडिलांची मोठी बहीण शोभा गुंडाळे यांनी या दोघांचा सांभाळ केला. चेतन हे भारतीय सैन्यदलात तर दयानंद हे भारतीय नौदलात भारत मातेच्या संरक्षणात सेवा बजावत होते. मात्र चेतनवर काळानेच घाला घातला.
सप्टेंबरमध्ये झाला साखरपुडा
सप्टेंबर 2020 मध्ये चेतन यांचा विवाह यरगट्टी येथील मुलीशी ठरला होता. त्यानुसार साखरपुडाही झाला होता. फेब्रुवारी 2021 मध्ये विवाहाची तारीख ठरली होती. बुधवारी दुपारीच चेतन यांनी आपल्या आत्याला दूरध्वनीवरुन संपर्क साधून गावाकडची तसेच घराची खुशाली विचारली होती. मात्र अवघ्या दोन तासानंतरच पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात चेतन हुतात्मा झाल्याची माहिती मिळताच आत्याने एकच आक्रोश केला.
6 वर्षाची सेवा
चेतन सन 2014 मध्ये नाशिकमधून आर्टिलरी रेंजिमेंटमध्ये भरती झाले होते. सेवेतील अवघ्या 6 व्या वर्षीच त्यांना देशाच्या रक्षण करताना वीरमरण प्राप्त झाले. ही बाब नेर्ली गावकऱयांच्या दृष्टीने अभिमानाची ठरली असली तरी चेतन हुतात्मा झाल्याने याचे दुःख प्रत्येकाच्या चेहऱयावर दिसत आहे.









