दुकाने सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी ठेवावी : गावात गाडी फिरून जनजागृती करणार
प्रतिनिधी / म्हापसा
नेरूल पंचायत क्षेत्रात 26 कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने या पार्श्वभूमीवर आता मंगळवार दि. 14 जुलैपासून पुढील 8 दिवस संपूर्ण गाव लॉकडाऊन करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्यावतीने झालेल्या बैठकीत एकमताने घेण्यात आला. पंचायत सभागृहात झालेल्या या बैठकीला आमदार जयेश साळगावकर उपस्थित होते. या आठ दिवसाच्या कालावधीत या गावातील सर्व दुकाने सकाळी 7 ते दु. 12 वाजेपर्यंतच खुली ठेवावी असेही ठरविण्यात आले. सर्वांनी आपापल्या घरीच रहावे असे आवाहन यावेळी आमदार जयेश साळगावकर यांनी केले.
आमदार साळगावकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत पंचायत मंडळ, डॉक्टर्स, पोलीस अधिकारी वर्ग, वीज अभियंता, अग्निशमन दल, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. उपजिल्हाधिकारी अक्षय पोतेकर, मामू हेगे, मामलेदार राजाराम परब, पोलीस निरीक्षक निनाद देऊलकर, वीज अभियंता सी. नेवरेकर, कांदोळी आरोग्य खात्याचे डॉक्टर नाझारेथ, सरपंच रेश्मा कळंगुटकर, उपसरपंच अभिजीत बाणावलीकर, पंच शशिकला गोवेकर, पंच आल्मेदा, संदीप भोसले आदी उपस्थित होते.
आमदार, डॉक्टर्स, पोलीस, पंच, ग्रामस्थांची एकत्रित बैठक
नेरूल भागात कोविड 19 रुग्णामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे याची दक्षता घेत गावच्या हितासाठी कोणता निर्णय घ्यावा याविषयी या बैठकीत सुमारे दोन तास चर्चा झाली. नागरिकांनी नाहक अफवांना बळी न पडता काही संशय असल्यास नागरिकांनी आपल्यास किंवा स्थानिक पंच सदस्यांकडून माहिती करून घ्यावी असे आमदार साळगावकर यांनी सांगितले. गावात ध्वनी फितीचा वापर करून कोरोनाबाबत जनजागृती करावी. तसेच दुकाने सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंतच सुरू ठेवावी असा निर्णय या बैठकीत झाल्याने त्याचे कठोर पालन करावे अशी मागणी यावेळी आमदारांनी केली.
गावात स्वयंसेवकांची नेमणूक करा
उपजिल्हाधिकारी अक्षय पोतेकर म्हणाले की, हा परिसर छोटा असल्याने हा परिसर सरकारने मायक्रो कंटेन्मेट विभाग असे जाहीर केले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आम्ही संसर्ग सर्वत्र न पसरविता तो आहे त्याच ठिकाणी त्याला ठेवूया असे ते म्हणाले. रुग्ण आढळल्यास ती जागा सिल करण्यास उधा न थांबता त्वरित सीलबंद करावी. दक्षिणेच्या तुलनेत उत्तरेत कोविड रुग्ण कमी असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरपंच पंचांच्या मदतीने याठिकाणी स्वयंसेवकाची नेमणूक करावी अशी माहिती उपजिल्हाधिकाऱयांनी दिली. उपजिल्हाधिकारी हेगे यांनी येथील परिसर मायक्रो कंटेन्मेट करण्यात आल्याचे सांगण्यात आले. याठिकाणी रेपीड रिस्पोन्स पथक ला नागरिकांनी सहकार्य करावे असे ते म्हणाले.
नेरूल गावात पर्यटक नको
नेरूल भागात पर्यटक मोठय़ा प्रमाणात ये-जा करतात. त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी बाप्पा कोरगावकर यांनी केली असता त्याची दखल आम्ही घेतो असे त्यांनी सांगितले. आम्हाला आमच्या गावात पर्यटक नको. गेस्ट हाऊस, हॉटेलमध्ये टुरीस्ट राहतात त्यांचा रोग आम्हाला आला तर आम्ही कुठे जावे अशी मागणी पंच संदीप भोसले यांनी केले.
मास्क वापरा, थुकीतूनही कोरोना होऊ शकतो
डॉ. नाझारेथ यांनी थूकीपासून कोरोना पसरू शकतो यासाठी सर्वांनी दखल घेता मास्क वापरावे. 2 मीटरच्या अंतरावर उभे राहावे, हात स्वच्छ धूत रहावे असे आवाहन केले. कोरोनाची चाचणी केलेल्यांनी अहवाल येईपर्यंत घरातच रहावे असे आवाहन त्यांनी केले. जे रुग्ण पॉझिव्टिव्ह आहेत त्यांना धान्य आदी वस्तू आणण्यासाठी कुणीही स्वयंसेवक पुढे येत नाही असा आरोप संदीप भोसले यांनी केला. पंच शशिकला गोवेकर यांनी आपण नागरिकांसमवेत असल्याचे यावेळी सांगितले.









