वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नेपाळसह उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये रविवारी भूकंपाचा धक्का जाणवला. सकाळी 7.25 च्या सुमारास झालेल्या या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली. नेपाळमधील काठमांडूजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगण्यात आले. त्याची खोली 10 किलोमीटरपेक्षा कमी होती. भूकंपाचे धक्के जाणवताच अनेक लोक घराबाहेर पडले. बिहार आणि उत्तर प्रदेशात या भूकंपामुळे तीव्र हादरे जाणवले. मात्र, प्राथमिक माहितीनुसार कुठूनही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
नेपाळच्या भरतपूरमध्ये सकाळी 7.25 वाजता भूकंप झाला. भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी होती. यानंतर गोरखपूरमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. यामुळे जीवित किंवा वित्तहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे तज्ञ गौतम गुप्ता यांनी सांगितले. बिहारची राजधानी पाटणा आणि गोपालगंजसह इतर जिह्यांमध्ये रविवारी सकाळी लोक झोपेतून जागे होत असतानाच अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. जमीन हादरल्याची जाणीव झाल्यानंतर इमारती आणि मोठ्या घरांमध्ये राहणारे बरेच लोक मोकळ्या मैदानात आले. गोपालगंज, मोतिहारी, छापरा, बगहा, सिवान, पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. अवघ्या काही सेकंदांसाठी पृथ्वी हादरल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.









