आजारी पत्नीवर उपचारासाठी येणार
वृत्तसंस्था / काठमांडू
नेपाळचे माजी पंतप्रधान तसेच नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या दुसऱया गटाचे प्रमुख पुष्पकमल दहल उर्फ प्रचंड स्वतःच्या आजारी पत्नी सीता यांच्यावरील उपचारासाठी आज मुंबईत दाखल होणार आहेत. नेपाळमध्ये राजकीय कलह टोकाला पोहोचला असताना प्रचंड यांचा हा दौरा होत आहे. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष दोन गटांमध्ये विखुरला गेला असून एका गटाचे नेतृत्व पंतप्रधान केपी शर्मा ओली करत आहेत, तर दुसऱया गटाचे नेतृत्व दहल यांच्याकडे आहे.
प्रचंड यांच्या गटाने पंतप्रधान ओलींच्या विरोधात मोर्चा उघडला आहे. प्रचंड यांनी ओली यांच्याविरोधातील दुसऱया टप्प्यातील निदर्शनांनाही हिरवा झेंडा दाखविला आहे. आंदोलनाची पूर्ण रणनीति तयार करण्यात आली आहे. सर्वसामान्य लोकही ओलींच्या विरोधात उतरले आहेत असा दावा नेपाळ कम्युनिस्ट पक्षाचे नेते हिमल शर्मा यांनी केला आहे.
पंतप्रधान ओली यांच्या मंत्रिमंडळाच्या शिफारसीवर राष्ट्रपती विद्यादेवी भंडारी यांनी कनिष्ठ सभागृह विसर्जित करण्याची घोषणा केली होती. या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात 12 हून अधिक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नेपाळ कम्युनिस्ट पक्ष दोन गटांमध्ये विभागला जाणे चीनच्या पचनी पडलेले नाही. काही दिवसांपूर्वी चीनने कम्युनिस्ट पक्ष नेत्यांचे एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ काठमांडूत पाठविले होते, परंतु जोरदार प्रयत्न करूनही चीनला दोन्ही गटांमध्ये समेट घडवून आणता आलेला नाही.