सिंधुपाल चौक जिल्हय़ात अतिवृष्टी
काठमांडू :
नेपाळच्या सिंधुपाल चौक जिल्हय़ात दोन विविध ठिकाणी झालेल्या भूस्खलनात 9 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण बेपत्ता झाले आहेत. बचावमोहीम सुरू असून आतापर्यंत 9 मृतदेह हाती लागले आहेत. बेपत्ता व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. शनिवारी रात्रीपासून जिल्हय़ात अतिवृष्टी होत आहे. रविवारी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास भूस्खलनाच्या दोन घटना घडल्याची माहिती जिल्हा मुख्य अधिकारी उमेश कुमार ढकाल यांनी दिली आहे.
बरहाबीस शहरात झालेल्या भूस्खलनात दोन नागरी भाग जमीनदोस्त झाले आहेत. 19 घरांमध्ये पाणी शिरले आहे, तर मोठय़ा संख्येत अन्य घरांचेही नुकसान झाले ओ. 222 कुटुंबांसाठी तत्काळ निवाऱयाची गरज असल्याचे अधिकाऱयाने सांगितले आहे.
नेपाळच्या अधिकाऱयांनुसार चीनला लागून असलेल्या सिंधुपाल चौक जिल्हय़ात पूर आणि भूस्खलनाचा धोका असतो. 2015 मध्ये तेथे आलेल्या भूकंपात 9 हजार जणांना जीव गमवावा लागला होता. विशेषकरून बारहबीस भागात अतिवृष्टीनंतर भूस्खलन होण्याची भीती अधिक असते.
कांगोतही भूस्खलन : 50 जणांचा मृत्यू
पूर्व कांगोत सोन्याची एक खाण खचल्याने 50 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिण कीवू प्रांताच्या कमीतुगा शहरात सोन्याची खाण खचली आहे. मृतांमध्ये तरुण आणि मुलांचे प्रमाण अधिक असल्याची माहिती प्रांताच्या गव्हर्नरांनी दिली आहे. मागील अनेक दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे ही दुर्घटना घडली आहे. गव्हर्नरांनी प्रांतात दोन दिवसांचा शोक घोषित केला आहे. या दुर्घटनेत केवळ 1 युवक वाचू शकला आहे.









