नवी दिल्ली / वृत्तसंस्था
नेपाळमधील काही भागांमध्ये सध्या पूरपरिस्थिती ओढवली असून या पुरात एक भारतीय आणि दोन चीनी कामगार वाहून गेल्याचे वृत्त आहे. या तिघांचे मृतदेह नंतर सापडले. ही घटना शुक्रवारी घडली. हे कामगार एका चीनी कंपनीसाठी काम करीत होते. ही कंपनी पिण्याच्या पाण्याचा प्रकल्प बांधत होती. या घटनेत अद्याप 25 कामगार बेपत्ता असून त्यांच्यापैकी अनेकांचा मृत्यू झाला असावा अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. ही घटना सिंधूपालचौक या जिल्हय़ात घडली. हा जिल्हा तिबेट आणि नेपाळच्या सीमेवर असल्याची माहिती देण्यात आली. या भागातून सध्या नागरीकांचे स्थलांतर करण्यात येत असून त्यांना सुरक्षित आसऱयाच्या ठिकाणी हालविण्यात येत आहे. नेपाळमध्ये सध्या कोरोना विषाणूचेही थैमान सुरू असून जगातील सर्वात मोठे बाधितांचे प्रमाण हा देश दर्शवत आहे.









