ऑनलाईन टीम / काठमांडू :
नेपाळच्या सुधारित नकाशाला मंजुरी देण्यासाठी आवश्यक घटनादुरुस्ती विधेयकाला नेपाळ संसदेच्या वरिष्ठ सभागृहाने मंजुरी दिली आहे.
भारत आणि नेपाळमध्ये लिपुलेख, लिम्पियाधुरा, कालापानी या तीन भागांच्या सीमेवरून वाद आहेत. काही दिवसांपूर्वीच हे तिन्ही भाग नेपाळने आपल्या नकाशात दाखवले होते. 18 मे रोजी नेपाळ मंत्रिमंडळाने या नवीन नकाशाला मान्यता दिली. त्यानंतर या नकाशाच्या मंजुरीसाठी नेपाळ सरकारने प्रस्तावित केलेल्या घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला कनिष्ठ सभागृहात मंजुरी मिळाली.
कनिष्ठ सभागृहात मंजुरी मिळाल्यानंतर संसदेच्या वरिष्ठ सभागृहात हे विधेयक मंजुरीसाठी पाठविण्यात आले. त्यावेळी सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व 57 सदस्यांनी या विधेयकाच्या बाजूने मतदान केले. त्यामुळे हे विधेयक एकमताने मंजूर झाल्याची घोषणा संसदेचे अध्यक्ष गणेश तिमिल्सिना यांनी केली. आता हे विधेयक राष्ट्रपती बिंधिया देवी भंडारी यांच्याकडे स्वाक्षरीसाठी पाठविण्यात येणार असून, त्यानंतर ते घटनेत समाविष्ट केले जाईल.









