नेपाळ कम्युनिस्ट पक्षात जोरदार विरोध : चिनी राजदूतांचे पंतप्रधान ओली यांचे पद राखण्यासाठी प्रयत्न
काठमांडू/ वृत्तसंस्था
चीनच्या हातचे बाहुले ठरलेले नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची सत्ता वाचविण्यासाठी चिनी राजदूत हाओ यांकी पुन्हा एकदा सरसावल्या आहेत. चिनी राजदूताने ओली यांच्याशी बंद दाराआड पुन्हा राजकीय खलबते केली आहेत. ओली विरुद्ध पुष्पकमल दहल ‘प्रचंड’ या लढाईत चिनी राजदूताच्या हस्तक्षेपाला आता नेपाळ कम्युनिस्ट पक्षातच तीव्र विरोध होत आहे. ओली यांना स्वतःच्या पक्षात पाठिंबा नसल्याने त्यांचे सरकार केव्हाही कोसळू शकते.
यांकी आणि ओली यांनी सत्तारुढ पक्षाच्या एकीकरणाची प्रक्रिया आणि पक्षातील मतभेद सोडविण्यावर चर्चा केल्याचे समजते. चिनी राजदूत आणि ओली यांनी पक्षात फूट टाळण्यावर आणि सत्ता कायम ठेवण्यावरही चर्चा केली आहे. यांकी यांनी वाद संपविण्यासाठी तडजोड करण्याची सूचना केली आहे.
यापूर्वी नेपाळच्या राजकीय संकटात चिनी राजदूत यांकी यांनी ओली यांच्या मदतीसाठी हस्तक्षेप केला असता तेथे मोठा वाद उभा ठाकला होता. त्यानंतर चिनी राजदूत थेट पंतप्रधानांना भेटणार नसल्याचा दावा करण्यात आला होता, जो आता पोकळ ठरला आहे. सत्तारुढ नेपाळी कम्युनिस्ट पक्षातील अंतर्गत कलह टोकाला पोहोचलेला असताना ओली आणि चिनी राजदूतांची ही भेट झाली आहे. ओली हेच सत्तेवर रहावे याकरता चीनने चालविलेले प्रयत्न आता नेपाळच्या जनतेलाही खुपू लागले आहेत.
सहअध्यक्ष पुष्पकमल दहल यांच्यासमोर सचिवालयात होणारी पक्षाच्या स्थायी समितीची बैठक स्थगित करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान ओलींनी मांडला होता, परंतु दहल यांनी हा प्रस्ताव फेटाळला आहे. पक्षाच्या स्थायी समितीची बैठक आता 28 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मागील बैठकीत दहल यांनी एक दस्तऐवज सादर करून ओली यांच्या निर्णयांना अक्षम्य ठरवून त्यांचा राजीनामा मागितला होता. पंतप्रधानपदासाठी ओली हे अपात्र असल्याचेही दहल यांनी म्हटले होते.
संतप्त सूर
या राजकीय उलथापालथीदरम्यान ओली यांनी चिनी राजदूतांची भेट घेतलयाने सत्तारुढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षातून संतप्त सूर उमटत आहेत. दोघांच्याही भेटीसाठी ही योग्य वेळ नव्हती, असे उद्गार पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य रघुजी पंत यांनी काढले आहेत. यांकी यांच्या या कृतीमुळे कम्युनिस्ट पक्ष चिनी राजदूतांच्या इशाऱयावर काम करत असल्याचा संशय गडद होत चालला आहे. चीनच्या इशाऱयावर ओली यांनी भारताच्या विरोधातही निर्णय घेतले आहेत.
ओली यांच्यावर टीका
21 ऑक्टोबर रोजी नेपाळच्या पंतप्रधानांनी रॉ या भारताची गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखांशी चर्चा केली होती. ओली या भेटीवरूनही अडचणीत आले आहेत. अशाप्रकारची उघड भेट राष्ट्रीय सार्वभौमत्वाला कमकुवत करते, तसेच मोठय़ा शक्तींमधील प्रतिस्पर्धा वाढवत असल्याचे नेपाळी काँग्रेसचे नेते आणि माजी विदेशमंत्री प्रकाश शरण यांनी म्हटले आहे. ओली आणि यांकी यांची ही भेट चुकीची होती. एक राजदूत पंतप्रधानांना भेटू शकत नाही. एका राजदूतासोबत पक्षाच्या अंतर्गत विषयांसंबंधी चर्चा करणे योग्य नसल्याचे नेपाळ कम्युनिस्ट पक्षाच्या स्थायी समितीचे सदस्य लीलामणि पोखरेल यांनी नमूद केले आहे.









