काठमांडू / वृत्तसंस्था
नेपाळचे पंतप्रधान शेरबहादूर देऊबा यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. त्यांनी मंत्रिमंडळात नव्या 17 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्र्यांचा समावेश केला असून शुक्रवारी नव्या मंत्र्यांचा शपथविधी पार पडला. देऊबा पाच पक्षांच्या युती सरकारचे नेतृत्व करीत आहेत. नव्या मंत्र्यांमध्ये या सर्व पक्षांचे सदस्य आहेत. तीन महिन्यांपूर्वी देऊबा मंत्रिमंडळ सत्तेवर आलेले आहे.
या विस्ताराबरोबरच नेपाळ मंत्रिमंडळातील सदस्यांची संख्या 25 झाली असून यापैकी 22 कॅबिनेट मंत्री तर 3 राज्यमंत्री आहेत. देऊबा हे नेपाळी काँगेस या पक्षाचे नेते आहेत. मंत्रिमंडळात त्यांच्या पक्षाचे 8 कॅबिनेट मंत्री आणि 1 राज्यमंत्री आहे. तर जनता सोशॅलिस्ट पक्षाचे 5 कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री आहे. नेपाळी काँगेसकडे गृह आणि विदेश व्यवहार, संरक्षण आणि सूचना प्रसारण तसेच दळणवळण अशी महत्वाची खाती आहेत. आरोग्य आणि लोकसंख्या ही खाती सोशॅलिस्ट पक्षाला देण्यात आली आहेत, अशी माहिती देण्यात आली.









