परवा अचानक वर्तमानपत्र वाचताना एका छोटय़ा जाहिरातीवर लक्ष गेलं, ‘खास महिलांसाठी नेपाळ यात्रा.’ मी लगेचच दिलेल्या नंबरवर संपर्क केला. योगायोगाने शेवटच्या दोनच जागा शिल्लक होत्या. माझ्याबरोबर येण्यासाठी माझी धाकटी जाऊ उज्ज्वला सुद्धा लगेच तयार झाली. आमच्या जागा आम्ही लगेचच बुक करून टाकल्या. जायला तसे 20-28 दिवस होते खरे, पण आमची तयारी पहिल्या दिवसापासून सुरू झाली होती.
निघायचा दिवस उजाडला. बेळगावहून खासगी बसने मुंबईपर्यंत व त्यानंतर रेल्वेने मुंबई ते गोरखपूर व पुढे पुन्हा खासगी बसने गोरखपूर ते नेपाळ असा मजल दर मजल सुमारे तीस तासांचा प्रवास होता. आम्ही एकूण 26 महिला, त्यात बावीसजणी बेळगावच्या तर चारजणी मुंबई येथून आम्हास मिळणार होत्या. थंडीचे दिवस असल्याने गरम कपडे घेण्याबद्दल आम्हाला विशेष सूचना आमची ग्रुप लीडर छाया साबोजी हिने आधीच दिल्या होत्या. चोवीस डिसेंबरच्या रात्री खासगी बसने आम्ही बेळगाव सोडले. सकाळी मुंबई सेंट्रल येथे स्टेशनवर पोचलो. सकाळी अकरा वाजता निघायची गाडी आधीच उशीरा म्हणजे सुमारे एक वाजता सुटली. तेपर्यंत आम्ही रेल्वे स्टेशनच्या वेटिंग रुम मध्येच टाईमपास करत होतो. आमच्या या ग्रुपमधील नवीन मेंबर्सच्या ओळखीपाळखी सुद्धा झाल्या. सुमारे तीस तासांचा रेल्वेचा प्रवास कसा संपला ते कळले नाही. प्रवासामध्ये टूर कंपनीने आमची व्यवस्था चांगली ठेवली होती. टेन उशीरा असल्याने सव्वीस तारखेच्या रात्री एकदाचे आम्ही गोरखपूरला पोचलो. गोरखपूर येथील एका सुसज्ज व स्वच्छ अशा धर्मशाळेत आमची भोजनाची सोय झाली होती. ‘आनंद यात्रा’ चे स्वयंपाकी व सहकारी आमच्या आधीच तिथे पोचले होते. त्यांनी अत्यंत रुचकर जेवण सर्वांना आग्रहाने जेवू घातले. जेवण झाल्या झाल्या पुन्हा खासगी बसने आमचा प्रवास नेपाळच्या दिशेने सुरू झाला. गोरखपूर ते भैरवा हा सुमारे शंभर कि. मी. चा प्रवास संपवून आम्ही रात्री अकरा वाजता भैरवा नेपाळ येथे पोचलो. अत्यंत उत्तम अशी रहाण्याची सोय केली होती.
दुसऱया दिवशी म्हणजेच सत्तावीस तारखेच्या सकाळी आम्ही लुंबिनी या भगवान बुद्धाच्या जन्मस्थळी पोचलो. अत्यंत प्रेक्षणीय आणि पवित्र असे हे ठिकाण आहे. जगातील समस्त बौद्ध धर्मियांचे हे परम श्रद्धास्थान आहे. याठिकाणी जपान, इंडोनेशिया, म्यानमार आदी देशांचे बौद्ध विहार सुद्धा पाहण्यासारखे आहेत. लुंबिनी पाहून आम्ही बसने चितवन या आमच्या पुढील ठिकाणी त्याच रात्री सुमारे आठ वाजता पोचलो. चितवन येथे सुद्धा रहाण्याची सोय उत्तम होती.
दुसऱया दिवशी सकाळी सहाच्या दरम्यान आम्ही तराई जंगल क्षेत्राच्या सफारी वर निघालो. सुमारे दोन तासांच्या घनदाट जंगलातील सफारीमध्ये कुठली मोठी जनावरे पहाण्याचा योग काही आला नसला तरी अनेक छोटे छोटे प्राणी तसेच अनेक पक्षी पहाण्याचा योग मात्र आला. जंगल सफारी नंतर आम्ही परत मुक्कामी परतलो. नाश्ता भोजनादी कार्यक्रमानंतर आम्ही आमच्या बसने काठमांडूला निघालो. चितवन ते काठमांडू हे सुमारे दोनशेहे कि.मी. अंतर पार करून रात्री नऊ साडेनऊच्या दरम्यान आम्ही काठमांडूला पोचलो. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. विश्वप्रसिद्ध पशुपतिनाथ देवालय इथेच स्थित आहे. काठमांडू अत्यंत सुंदर व स्वच्छ शहर आहे. खूप उंच टोलेजंग इमारती इथे नाहीत. सर्व शहर साधारण बसक्या इमारतीनीच वसले आहे. पण शहर अत्याधुनिक वाटत नाही.
प्रशस्त रस्ते आहेत व गर्दीदेखील आपल्या छोटय़ा शहरांइतकीच आहे. आम्ही शहराच्या मध्यवस्तीतच असलेल्या भव्य दिव्य अशा पशुपतिनाथ मंदिराला भेट दिली. संपूर्ण मंदिर मुख्यत्वे करून लाकडी बांधकामाने बनविले आहे. अत्यंत सुबक असे नक्षीकाम असलेले खांब व महिरपी पाहून मन थक्क होते. या देवालयात आम्ही लघुरुद्र, पूजा वगैरे देवास अर्पण केले. तेथील पुजारीगण अत्यंत नम्र व मृदुभाषी होता. देव दर्शनानंतर काठमांडूतील बाजारामध्ये शॉपिंग केले. तऱहेतऱहेचे मोती, खडे व रुद्राक्ष यासाठी येथील बाजार प्रसिद्ध आहे. दुपारनंतर आम्ही काठमांडूहून ‘रोप वे’ ने सुप्रसिद्ध अशा ‘चंद्रगिरी हिल्स’ पहायला गेलो. तेथून आम्हाला जगप्रसिद्ध एव्हरेस्ट पर्वताचे दर्शनसुद्धा झाले. तेथून परतल्यावर भोजनादी कार्यक्रमानंतर काठमांडू येथील प्रसिद्ध असलेल्या ‘चायना मार्केट’मध्ये शॉपिंगला गेलो. आजकाल भारतीयांसाठी चिनी वस्तुंचे काही अप्रुप राहिलेले नाही पण गंमत म्हणून आम्ही चायना मार्केटमध्ये छोटी मोठी खरेदी केली.
काठमांडूपासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या नागरकोट या ठिकाणी सूर्येदय पहाण्यासाठी पहाटे तीन वाजताच उठून जायचे होते. बाहेर तापमान फक्त तीन चार डिग्री एवढे थंड होते. पण पहाटेची किरणे माउंट एव्हरेस्ट व आसपासच्या शिखरांवर पडतात, तो देखावा पाहण्यासारखा होता. सूर्योदयानंतर तिथेच असलेल्या चंगुनारायण या पॅगोडासदृश्य असलेल्या प्राचीन अशा विष्णू मंदिराचे सुद्धा दर्शन घेतले.
आमच्या या नेपाळ टूरचे पुढचे गाव होते पोखरा. काठमांडूपासून पोखरा हे सुमारे दोनशेहे कि. मी. आहे. जवळजवळ आठ तासांच्या वळणावळणाच्या घाटदार रस्त्यावरून प्रवास करत आम्ही रात्री पोखरा येथे पोचलो. आदल्या दिवशीच आम्ही भक्तपूर या नेपाळमधील सर्वात प्राचीन अशा शहराला भेट दिली. अनेक पुरातन मंदिरे पहाण्याचा योग आला. वैशि÷य़पूर्ण अशा लाकडी बांधकामातील मंदिरे अत्यंत सुबक आहेत. भक्तपूरपासून जवळ असलेल्या ललितपूर या नवीन शहरांमध्ये धातू व दगडांपासून बनविल्या जाणाऱया मूर्तीकामाचा सुद्धा परिचय झाला.
काठमांडू ते पोखरा प्रवासात लागणारे अत्यंत महत्त्वाचे ठिकाण म्हणजे मनोकामना देवीचे मंदिर. हे मंदिर दुर्गम अशा टेकडीवर वसलेले आहे. आपल्या सर्व मनोकामना येथील देवी पूर्ण करते, असा श्रद्धाळूंचा विश्वास आहे. सदर मंदिराला जाण्यासाठी रोपवेची उत्तम सोय होती. आम्ही देवीचे दर्शन घेऊन पोखरा येथे प्रस्थान केले. पोखरा येथील बिंद वासिनी म्हणजेच दुर्गादेवीचे मंदिर प्रसिद्ध आहे. हे सुद्धा खूप प्राचीन मंदिर आहे. येथील मूर्ती ही भारतातून नेण्यात आली आहे, असे सांगण्यात आले. पोखरा येथील जुनाबाजारसुद्धा प्रसिद्ध आहे. येथे मणी, मोती व शाळिग्राम यांची मोठय़ा प्रमाणात विक्री होते. पोखरा येथून जवळच असलेल्या ‘देवीचा धबधबा’ उर्फ ‘पाताल चँगो’ ही पाहण्याचा योग आला. येथून सुद्धा हिमालयाच्या शिखरांचे मनोरम दृश्य पहाण्याजोगे होते.तेथूनच जवळ असलेल्या गुप्तेश्वर गुहा सुद्धा पहाण्याजोग्या होत्या.
आमच्या या टूरमध्ये फक्त महिलांचाच सहभाग होता. सुमारे पस्तीस ते सत्तर वयोगटातील सर्व स्त्रिया अगदी उत्साहाने संपूर्ण सहलीमध्ये सहभागी होत्या. नववर्षाची पार्टी आम्ही 31 डिसेंबरला रात्री पोखरा येथे गेस्ट हाऊसमध्ये जोरात साजरी केली. उत्साहाला वयाची मर्यादा नसते याचा प्रत्यय या सहलीत मला वारंवार आला. पुढल्यादिवशी सकाळी आम्ही पोखरा ते गोरखपूर असा आठ-नऊ तासांचा दुर्गम असा प्रवास करून रात्री गोरखपूर गाठले. रात्री सुमारे दहा वाजता मुंबईसाठी निघणारी टेन पकडण्याच्या धावपळीत गोरखपूर येथील प्राचीन व सुप्रसिद्ध असे गोरखनाथाचे दर्शन घेतले.
रोजच्या रहाटगाडग्यापासून बाहेर आल्यामुळे आम्ही आठ दहा दिवस आमच्या घरादाराला पूर्णपणे विसरलो होतो. सर्वजणींनी आम्ही अगदी दिलखुलासपणे या सहलीचा आनंद लुटला. अशी ही नेपाळची ट्रीप एक अविस्मरणीय अनुभव होता.
– अंजली देशपांडे











