नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुट यांनी देशात 5 आठवडय़ांची कठोर टाळेबंदी लागू केली आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणूला रोखण्यासाठी याहून अधिक प्रभावी उपाय नाही. आम्ही कठोर टाळेबंदी लागू करत आहोत. या कालावधीत शाळा, दुकाने, संग्रहालये आणि व्यायामशाळा बंद राहणार आहेत. 19 जानेवारीपूर्वी कुठल्याही प्रकारचा दिलासा मिळेल अशी अपेक्षा करू नये. भविष्यात स्थिती भयावह होण्यापासून रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीच लागतील, असे रुट यांनी म्हटले आहे.
रुट हे टाळेबंदीची घोषणा करत असतानाच त्यांच्या कार्यालयाबाहेर हजारो निदर्शकांनी याच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे. कुठल्याही घरात कमाल 2 अतिथी भेट देऊ शकतात आणि यासाठीही स्थानिक प्रशासनाची मंजुरी घ्यावी लागणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. 24 ते 26 डिसेंबर या कालावधीत सरकार काही प्रमाणात दिलासा देण्याचीही शक्यता आहे. नेदरलँडमध्येही संक्रमण वाढत चालले आहे.









