युक्रेनवर 3-2 गोलफरकाने मात, डेन्झेल डम्फ्रीजचा गोल ठरला निर्णायक
वृत्तसंस्था/ ऍम्स्टरडॅम
डेन्झेल डम्फ्रीजने नोंदवलेल्या नाटय़मय विजयी गोलनंतर यजमान नेदरलँड्सने युरो चषक स्पर्धेतील साखळी सामन्यात युक्रेनवर 3-2 अशी मात करीत विजयी पुनरागमन केले.
बदली खेळाडू नाथन आकेकडून मिळालेल्या क्रॉस पासवर हेडरद्वारे डम्फ्रीजने नेदरलँड्सचा तिसरा व निर्णायक गोल नेंदवला. यजमान नेदरलँड्सने दोन गोलांची आघाडी मिळविली होती. पण त्यांना ती टिकविता न आल्याने युपेनने नंतर 2-2 अशी बरोबरी साधली. कर्णधार जॉर्जिनिओ विनाल्डम व वावुट वेगहॉर्स्ट यांनी नेदरलँड्सला 60 व्या मिनिटापर्यंत 2-0 अशी आघाडी मिळवून दिली होती. पण अँड्रीय यारमोलेन्को व रोमन यारेमचुक यांनी गोल नेंदवून युक्रेनला बरोबरी साधून दिली. अखेरच्या टप्प्यात डम्फ्रीजने गोल नोंदवत यजमानांना पहिला विजय मिळवून दिला. सात वर्षांच्या खंडानंतर या स्पर्धेत खेळताना विजयी सुरुवात झाल्याने प्रँक डी बोए यांच्या संघाचे मनोबल उंचावले आहे. गुरुवारी या संघाची लढत ऑस्ट्रियाविरुद्ध होणार असून हाच जोम त्या सामन्यातही कायम ठेवण्याचा इरादा डी बोए यांनी व्यक्त केला. रविवारी झालेल्या सामन्यात ऑस्ट्रियानेही गट क मधील सामन्यात उत्तर मॅसिडोनियावर विजय मिळविला.
नेदरलँड्स-युक्रेन यांच्यातील सामना बराच रंगतदार ठरला. या सामन्यासाठी 16000 प्रेक्षकांची उपस्थिती होती. स्थानिक अजॅक्स क्लबचे हे घरचे मैदान असल्याने या क्लबचा माजी खेळाडू असलेल्या डेन्मार्कच्या एरिकसनला पाठिंबा देणारे बॅनर्स ते दर्शवित होते. शनिवारच्या सामन्यावेळी एरिकसनला हृदयाघात झाल्याने तो मैदानातच कोळसला होता. त्यानंतर डॉक्टर्सनी त्याच्यावर उपचार करून त्याची हृदयगती सुरू करून त्याला जीवनदान दिले होते. 2013 मध्ये टॉटनहॅम संघात जाण्यापूर्वी तो अजॅक्स संघाचा सदस्य होता. त्यामुळे डचच्या अनेक खेळाडूंशी त्याचे स्नेहसंबंध आहेत. त्यामुळेच एरिकसनच्या त्या घटनेनंतर डच खेळाडू खूप भावूक झाले होते.
युरो 2016 व 2018 विश्वचषक स्पर्धेसाठी पात्रता मिळविण्यात नेदरलँड्स संघ अपयशी ठरला होता. 2014 विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळवल्यानंतर ते प्रथमच मोठय़ा स्पर्धेत खेळत आहेत. 13 वर्षांपूर्वी 2008 युरो स्पर्धेत त्यांनी रोमानियाचा 2-0 असा पराभव केला होता. त्यानंतर त्यांना युरो स्पर्धेत एकही विजय मिळविता आला नव्हता. त्यांचे प्रशिक्षक डी बोए यांनी या सामन्यात 3-5-2 रचनेचा वापर केला आणि प्रेन्की डी जाँग व मेम्फीस डीपे यांना आघाडीवर ठेवले होते. डम्फ्रीज प्रतिस्पर्ध्यांना सतत धोकादायक ठरत होता. पूर्वार्धातच त्याच्या नावावर गोल लागला असता. पण त्याचा हेडर युक्रेनचा गोलरक्षक जॉर्जी बुशानने अप्रतिम बचाव करीत वाया घालविला. उत्तरार्धाच्या प्रारंभी यजमानांना पहिले यश मिळाले. डम्फ्रीजने मारलेला फटका युक्रेन गोलरक्षक बुशानने थोपवण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्याकडून विनाल्डमच्या आवाक्यात आला आणि त्याने त्याला गोलजाळय़ाची अचूक दिशा दिली. त्यानंतर वेगहॉर्स्टने डम्फ्रीजने निर्माण करून दिलेल्या संधीवर संघाचा दुसरा गोल नोंदवला. 75 व्या मिनिटाला यारमोलेन्कोने जोरदार फटक्यावर युक्रेनचा पहिला गोल नेंदवला. त्यानंतर यारेमचुकने रुसलान मॅलिनोवस्कीच्या फ्री किकवर हेडरद्वारे दुसरा गोल नोंदवून बरोबरी साधून दिली होती. सामना अनिर्णीत राहणार असे वाटत असतानाच अखेरच्या टप्प्यात डम्फ्रीजने विजयी गोल नोंदवत सामना संपवला.









