वृत्तसंस्था/ ऍमस्टरडॅम (नेदरलँडस्)
नेदरलँडस् क्रिकेट संघातील फलंदाज स्टीफन मायबर्गने सोमवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नेदरलँडस्ने बलाढय़ दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का दिल्यानंतर मायबर्गने हा निर्णय जाहीर केला.
नेदरलँडस्चा या स्पर्धेतील हा ऐतिहासिक विजय म्हणावा लागेल. दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात स्टीफेन मायबर्गने 30 चेंडूत 37 धावा जमवित आपल्या संघाच्या विजयाला हातभार लावला. मायबर्गच्या या खेळीमुळे नेदरलँडस्ला 158 धावांपर्यंत मजल मारता आली. पण त्यानंतर दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 13 धावा कमी पडल्या. मायबर्गने 2011 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना 22 वनडे आणि 45 टी-20 सामन्यात नेदरलँडस्चे प्रतिनिधीत्व केले. चालू वर्षाच्या प्रारंभी तो वनडे क्रिकेटमधून निवृत्त झाला होता. मायबर्गने 22 वनडे सामन्यात 26.35 धावांच्या सरासरीने 527 धावा जमवल्या असून त्यामध्ये 4 अर्धशतकांचा समावेश आहे. मायबर्गने 45 टी-20 सामन्यात 21.78 धावांच्या सरासरीने 915 धावा जमविल्या असून त्यामध्ये 5 अर्धशतकांचा समावेश आहे. ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धेत त्याने तीन सामन्यात 51 धावा जमविल्या होत्या. नेदरलँडस्ने गट 2 मधील गुणतक्त्यात पाच सामन्यातून दोन विजयासह 4 गुण घेत चौथे स्थान मिळवले होते.








