अर्चना गावकर यांच्यासह पंचायत संचालकांच्या परिपत्रकाचा आधार घेऊन रजनी गावकर याही दाखल, घोळ कायम
प्रतिनिधी / सांगे
नेत्रावळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचा तिढा सुटता सुटेना अशी परिस्थिती झाली आहे. निवडणुकीद्वारे निवड होऊन गेले साडेएकोणीस महिने कारभार पाहणाऱया सरपंच अर्चना गावकर व पंचायत संचालकांच्या परिपत्रकामुळे सरपंच म्हणून कार्यरत होऊ शकणाऱया रजनी गावकर या दोघांनीही गुरुवारी सकाळी पंचायतीच्या कार्यालयात आगमन केले. अर्चना गावकर या सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या, तर रजनी गावकर यांनी सरपंच म्हणून इतरत्र बसून कागदपत्रांवर सही केल्या. त्यामुळे अजूनही घोळ काही संपलेला दिसून येत नाही.
पंचायत संचालकांनी 17/25 नोव्हेंबर रोजी परिपत्रक जारी करून रजनी गावकर या सरपंच म्हणून कारभार पाहू शकता असे म्हटले होते. परंतु या पंचायतीच्या सरपंच म्हणून कारभार रीतसर निवडणुकीच्या माध्यमातून निवड झालेल्या अर्चना गावकर पाहत आहेत. त्यामुळे खरा सरपंच कोण असा प्रश्न निर्माण झाला असून या घोळातून नेत्रावळी पंचायतीचा कारभार सरपंचांविना गेले सुमारे तीन आठवडे ठप्प झाला होता.
रजनी गावकर यांची सही घेण्याच्या सचिवांच्या सूचना
रीतसर निवडून आलेल्या सरपंच अर्चना गावकर या गुरुवारी सरपंचपदाच्या खुर्चीवर विराजमान झाल्या, तर दुसरीकडे संचालकांनी न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करावी म्हणून काढलेल्या परिपत्रकाचा आधार घेऊन रजनी गावकर यांनी सरपंच म्हणून कामकाज पाहिले. तसेच काही दाखल्यांवर त्यांनी सही केली. त्यामुळे लोकांत उलटसुलट चर्चा चालू झाली आहे. पंचायतीच्या सचिव मंजूळ नाईक रजेवर होत्या. पण त्यांनी संबंधितांना रजनी गावकर यांची सरपंच म्हणून कागदपत्रांवर सही घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंचायत संचालकांच्या परिपत्रकाने रजनी गावकर यांना सरपंच म्हणून स्थापित केले असल्याचे त्या म्हणाल्या.
नागरिकांकडून संताप
एकूणच या प्रकाराबद्दल नेत्रावळीतील नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वास्तविक यापूर्वी पंचायत संचालकांनी निवडणूक घेऊन 1 एप्रिल, 2019 रोजी रीतसर अर्चना गावकर यांची नेत्रावळीच्या सरपंच म्हणून निवड झाली होती. तसेच न्यायालयाने त्यांना पद खाली करण्याचे निर्देश दिलेले नाहीत. त्यामुळे कोणत्या कायद्याने त्यांना बदलता येते, असा सवाल नागरिक करताना दिसून येत आहेत.
पंचायत सचिव मंजूळ नाईक यांनी गटविकास अधिकारी व पंचायत संचालकांना पत्र पाठवून स्पष्टवाक्मयता मागितली होती. पण अजूनपर्यंत त्यावर पंचायत संचालकांनी आपले मत दिलेले नाही. मात्र गटविकास अधिकाऱयांनी पंचायत संचालकांचे परिपत्रक अंमलात आणण्याचे तोंडी आदेश पंचायत सचिवांना दिले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या घोळात कित्येक दिवस जनतेला मात्र नाहक अडचणींना सामोरे जावे लागले आहे.
दरम्यान, राखी नाईक यांनी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निवाडय़ावर सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली असून तेथे काय होते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या तरी नेत्रावळी पंचायतीला दोन सरपंच प्राप्त झाले आहेत असे दिसते. मुळात सरपंच म्हणून गेल्या अनेक महिन्यांपासून कार्यरत असलेल्या अर्चना गावकर यांना उद्देशून कोणताच आदेश कुणीही जारी केलेला नाही.









