प्रतिनिधी/ खेड
कोकण मार्गावरून धावणाऱया लोकमान्य टिळक-एर्नाकुलम नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये सोमवारी दुपारी 3.45 वाजता नातूवाडी बोगद्यानजीकच बिघाड झाला. खेड येथून रिलीफ इंजिन दाखल झाल्यानंतर दीड तासानंतर एक्स्प्रेस मार्गस्थ झाली. यामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक विस्कळीत झाले.
सोमवारी लोकमान्य टिळक टर्मिनस-एर्नाकुलम नेत्रावती एक्स्प्रेस नातूवाडी बोगद्यानजीक आली असता अचानक इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लोकोपायलटच्या निदर्शनास आले. याबाबत तातडीने वरिष्ठ कार्यालयास कळवण्यात आले. बोगद्यातच इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे रेल्वे प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली.
रेल्वे बोगद्यात रखडल्याने प्रवाशांना चांगलाच घाम फुटला. खेड स्थानकात उपलब्ध असलेले नवीन रिलीफ इंजिन तातडीने घटनास्थळी रवाना झाले. हे इंजिन जोडल्यानंतर नेत्रावती एक्स्प्रेस दीड तासानंतर एर्नाकुलमच्या दिशेने मार्गस्थ झाली. ही एक्सप्रेस स्थानकात सायंकाळी 5.30 च्या सुमारास दाखल झाली. या बिघाडामुळे कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक काहीसे बिघडले. मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात एक तास थांबवण्यात आली.
प्रत्येक बोगीतील प्रवाशांची विचारपूस
‘नेत्रावती’च्या इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे अनेक प्रवासी बोगीत अडकले. रेल्वे प्रशासनाने 20 हून अधिक रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी रवाना केले. अडकलेल्या सर्व प्रवाशांची प्रत्येक बोगीत जावून विचारपूस केली. कोणाला त्रास झाला नसल्याची खातरजमाही केल्याची माहिती कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.









