पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष द्या : 23 ज्येष्ठ नेत्यांची पत्राद्वारे मागणी, सोनिया गांधी राजीनाम्याच्या तयारीत
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँगेस पक्षाला केवळ कार्यालयीन काम नव्हे, तर जनतेत उतरून काम करणारा पूर्णवेळ पक्षाध्यक्ष द्या अशी मागणी पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी एका पत्राद्वारे केली आहे. या ‘लेटरबाँब’मुळे प्रचंड खळबळ उडाली असून सोनिया गांधींनी अस्थायी अध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शविल्याची माहिती सूत्रांनी दिली. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण बैठक आज सोमवारी आयोजित करण्यात आली असून ती वादळी ठरण्याची शक्यता आहे. काँगेसचे नेतृत्व सोनिया गांधी किंवा गांधी घराण्यातीलच व्यक्तीने करावे, अशीही मागणी पुढे आली असून त्यावरून पक्षात दोन तट पडल्याची चिन्हे दिसत आहेत, असे तज्ञांचे मत आहे. हे पत्र या नेत्यांनी 15 दिवसांपूर्वीच पाठविले असल्याचेही स्पष्ट झाले आहे.
सोनिया गांधी यांच्या काँग्रेसमधील अंतरिम अध्यक्षांना एक वर्ष पूर्ण झाले असून ज्येष्ठ नेत्यांच्या पत्रामुळे आता पक्षाने नवीन अध्यक्ष निवडण्याची तयारी दर्शविली आहे. या दिशेने सोमवारी काँग्रेस कार्यकारी समितीची (सीडब्ल्यूसी) बैठक होणार आहे. स्थानिक पातळीपासून अध्यक्षपदापर्यंत सर्व पदाधिकाऱयांची निवड निवडणुकीच्या माध्यमातून घ्यावी अशी पत्र पाठविणाऱया नेत्यांची मागणी आहे. त्यासंबंधीही आजच्या बैठकीतून काही दिशानिर्देश स्पष्ट होण्याची शक्यता आहे. मात्र, या बैठकीच्या आधीच गांधी कुटुंब समर्थक आणि पक्षांतर्गत निवडणुकीचे समर्थक अशा दोन गटांध्ये पक्ष विभागला गेल्याचे दिसत आहे. सोनिया गांधी या बैठकीत कोणती अधिकृत भूमिका घेतात आणि पक्षाध्यक्षपदासंबंधी कोणते संकेत मिळतात याकडे काँगेस कार्यकर्त्यांसह भाजप व इतर पक्षांमध्येही उत्सुकता असल्याचे पहावयास मिळत आहे.
पत्राची गंभीर दखल
पक्षाच्या काही वरिष्ठ नेत्यांनी पाठविलेल्या पत्राची गंभीर दखल सध्याच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी घेतली आहे. या पत्रानंतर त्यांनी काही निकटवर्तीय नेत्यांशी चर्चाही केली असून पक्षात लवकरच बदल करण्याच्या दृष्टीने व्यापक तयारी करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यानुसार सर्वांनी एकत्रित येऊन नव्या अध्यक्षाची निवड करावी अशी स्पष्ट सूचना त्या सोमवारच्या बैठकीमध्ये त्या करणार असल्याचे समजते. सोनिया गांधी यांनी नेत्यांच्या पत्रालाही उत्तर दिले असून त्यात त्यांनी नेतृत्त्वबदलाचे संकेत दिले आहेत. यापूर्वी 10 ऑगस्ट रोजी झालेल्या काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीमध्येही सोनियांनी पक्षाचे नेतृत्व करण्यासाठी कोणीतरी तयार रहा, असे सुतोवाच केले होते अशी माहिती आपली ओळख गुप्त ठेवण्याच्या अटीवर पक्षाच्या एका ज्ये÷ नेत्याने दिली.
माजी मुख्यमंत्री, माजी मंत्र्यांचा समावेश
सोनिया गांधी यांना पत्र पाठविणाऱया नेत्यांमध्ये पाच माजी मुख्यमंत्री व अनेक माजी केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे, असे सांगण्यात येते. सलग दोन लोकसभा निवडणुकांमधील दारूण पराभव, अनेक राज्यांमध्ये डळमळीत झालेला पाया, पक्षातील तरूण नेत्यांची नाराजी, अनेक आमदारांनी पक्षांतर केल्याने गमवावी लागलेली राज्य सरकारे, इत्यादी अनेक घडामोडींमुळे पक्षाला उतरती कळा लागून तो बॅकफूटवर गेला आहे. त्याला पुन्हा नवसंजीवनी देण्याची आवश्यकता आहे. यासाठी क्रियाशील आणि जनतेत जाऊन काम करणारा अध्यक्ष हवा आहे, असे पत्र पाठविणाऱया नेत्यांचे प्रमुख म्हणणे आहे, असे सूत्रांनी स्पष्ट केले. शशी थरूर, खासदार विवेक तानसा, वीराप्पा मोईली, पृथ्वीराज चव्हाण, भूपिंदरसिंग हुड्डा, मुकुल वासनिक, रेणुका चौधरी, अजय सिंग, मिलिंद देवरागुलाम नबी आझाद, आंनद शर्मा, कपिल सिब्बल, मनीष तिवारी, राजेंद्र कौर भट्टल इत्यादी नेत्यांच्या स्वाक्षऱया या पत्रावर असल्याचेही सूत्रांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
राहुल गांधींना अध्यक्ष करा
काँगेससाठी गांधी कुटुंब अत्यंत महत्वाचे आहे. या कुटुंबाने देशाच्या प्रगतीत मोठे योगदान केले आहे. परिणामी, पक्षाच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांची पुन्हा निवड केली जावी, अशी मागणी पत्र पाठविणाऱयांपैकी काही जणांनी केली आहे. या मागणीवरही कार्यकारिणीं बैठकीत सविस्तर चर्चा होण्याची शक्यता आहे.
स्थानिक पातळीपर्यंत फेरबदलाची मागणी
कायमस्वरुपी अध्यक्षांच्या निवडीसह पक्षामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत फेरबदल करण्याची मागणीही या नेत्यांनी केली आहे. पक्षाच्या कार्यपद्धतीत व्यापक बदल करण्याबरोबरच, सत्तेचे विकेंद्रीकरण, राज्यांमधील पक्ष बळकटीकरण, प्रत्येक स्तरावर पक्षांतर्गत निवडणुका, केंद्रीय कार्यकारणीपासून ते स्थानिक पातळीपर्यंत निवडणुका आणि पक्षाच्या संसदीय मंडळासाठी तात्काळ प्रभावी घटना तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे. यावर बराच वादविवाद बैठकीत होऊ शकतो.
बैठकीपूर्वीच मतमतांतरे उघड
काँगेसचे नेतृत्व सोनिया गांधींकडेच असावे अशी मागणी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केल्याचे समजते. राजस्थान, पाँडीचेरी व छत्तीसगड राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना गांधी घराण्याकडेच पक्षाची धुरा असावी असे वाटते. तर राहुल गांधींकडे बहुसंख्य नेत्यांचा कल दिसून येतो. काही नेत्यांना निवडणुकीतून नेता निवडला जावा, अशी इच्छा आहे. अशा प्रकारे बैठकीपूर्वीच पक्षात गोंधळाचे वातावरण असल्याची माहिती आहे.
नेत्यांच्या दृष्टीने पक्षातील समस्या
ड राज्य पातळीवरील पदाधिकारी नियुक्त्या बराच काळ रखडलेल्या आहेत
ड पक्षाच्या युवा संघटनेचा पक्षाशी संपर्क असंतुलित, युवकांना प्राधान्य नाही
ड राज्य प्रदेश अध्यक्षांना निर्णय घेण्याचे स्वतंत्ररित्या अधिकार दिलेले नाहीत
ड जनतेत लोकप्रिय असणाऱया व जनाधार असलेल्या नेत्यांना प्राधान्य नाही
ड सर्वच आघाडय़ांवर पक्षसंघटना उदासिन, पुढाकार घेणाऱया नेत्याचा अभाव
ड राज्य पातळीवरील पक्षसंघटना खिळखिळी, केंद्रीय नेतृत्वाशी संपर्काची त्रुटी
पत्र पाठविणाऱयांच्या प्रमुख मागण्या
ड पक्षनेतृत्वात प्रभावी परिवर्तन, पूर्णवेळच्या कार्यरत नेतृत्वाची आवश्यकता
ड केंद्रीय कार्यकारिणीच्या निवडणुका त्वरित घेण्यासाठी योजना अत्यावश्यक
ड प्रदेश काँगेस समित्यांना परिस्थिती पाहून निर्णय घेण्याचे अधिकार हवेत
ड संसदीय पक्ष मंडळाची त्वरित स्थापना, जनहिताच्या प्रश्नांवर आक्रमक व्हावे
ड पक्षातील निष्क्रीयता आणि नैराश्य दूर करून नवसंजीवनीची आवश्यकता
ड पक्षसंघटनेच्या प्रत्येक पातळीवर निवडणुकीद्वारे पदाधिकारी निवडले जावेत









