आरसीयूचे उपकुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांचे प्रतिपादन : इंग्रजी विभागातर्फे राज्यस्तरीय कार्यशाळा
प्रतिनिधी /बेळगाव
चांगल्या वक्तृत्वाच्या व भाषा कौशल्याच्या जोरावर कोणत्याही क्षेत्रात कार्य करता येते. संवाद कौशल्य व भाषेवर प्रभुत्व मिळवल्यास नेतृत्त्वगुण अंगी येण्यास वेळ लागणार नाही. तसेच मुलाखतीला समर्थपणे तोंड देण्यासाठी सकारात्मक संवाद करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राणी चन्नम्मा विद्यापीठाचे उपकुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंग्रजी विभागाच्या प्रमुख डॉ. नागरत्ना व्ही. परांडे होत्या.
राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या इंग्रजी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी मुलाखत कौशल्य यावर एक दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन व प्रा. डॉ. कविता कुसुगल यांच्या ‘इंग्लिश फॉर एम्पपॉवरमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन उपकुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. पूजा हल्याळ यांनी सदर पुस्तकाबाबत माहिती दिली. यावेळी व्यासपीठावर प्रा. विजय एफ. नागन्नावर व प्रा. डॉ. मधुश्री कल्लीमनी उपस्थित होत्या. डॉ. नागरत्ना परांडे यांनी इंग्रजी विभागातर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांबाबत माहिती दिली.
सदर कार्यशाळा चार सत्रात आयोजित करण्यात आली होती. पहिल्या सत्रात संगमेश मेनशिनकाई यांनी पत्रकारितेतील संधी याबद्दल माहिती दिली. दुसऱया सत्रात डॉ. डी. गौतम यांनी तर तिसऱया सत्रात प्रा. अशोक डिसोजा यांनी मुलाखतीसंदर्भात माहिती दिली. शेवटच्या सत्रात प्रा. आर. एन. मनगोळी यांनी प्लेसमेंटबाबत माहिती दिली.
यावेळी प्रा. मनीषा नेसरकर, संतोष नाटीकर यांसह पीएचडी प्रशिक्षणार्थी एस. बी. कामती, एम. एच. जोगी, ए. ए. मुल्ला, बी. एन. शाडडळ्ळी उपस्थित होते. प्रारंभी स्वागतगीत पुष्पा वड्डर हिने गायिले. पाहुण्यांची ओळख एम. एच. जोगी यांनी करून दिली. सोनाली कल्लोळ्ळी व मानाप्पा बजंत्री या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. बी. कामती यांनी केले. कार्यक्रमाच्या समन्वयिका डॉ. कविता कुसुगल यांनी स्वागत करून शेवटी आभार मानले.









