जेरुसलेम:
इस्रायलचे वादग्रस्त पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना देशात सरकार स्थापना करण्यास मज्जाव करण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका इस्रायलमधील सर्वोच्च न्यायालयाने अनिर्णित ठेवली आहे. ही याचिका त्या देशातील काही वकिलांनी सादर केली होती. मात्र, या याचिकेवर निर्णय देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दर्शविला आहे.
चारवेळा इस्रायलचे पंतप्रधानपद भूषविलेले नेतान्याहू भ्रष्टाचाराच्या प्रकरणात आरोपी असून त्यांच्यावर गेल्या नोव्हेंबर महिन्यात ठपका ठेवण्यात आला होता. लाच घेणे, अफरातफर करणे आणि विश्वासाला तडा देणे असे अनेक आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. ते सर्व नेतान्याहू यांनी नाकारले असून स्वतःचा बचाव करण्यास आपण तयार असल्याचे म्हटले आहे.
वकिलांनी सादर केलेल्या या याचिकेत अनेक संवेदनशील मुद्दे असून सध्याच्या परिस्थितीत सर्वोच्च न्यायालयाला या मुद्दय़ांवर निर्णय देता येणे शक्मय नाही. आणखी काही काळानंतर या याचिकेवर विचार करता येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट
केले.









