प्रतिनिधी / बांदा:
घराच्या आजुबाजूची साफसफाई करीत असताना आपल्या माडाजवळ आग घातल्याचा समज करून चुलत भावाने मारहाण केल्याची घटना नेतर्डे येथे घडली. याबाबत रामप्रसाद श्यामसुंदर लाड (40, रा. नेतर्डे) यांनी चुलतभावाने आपल्याला मारहाण केल्याची तक्रार बांदा पोलिसात दिली. तक्रारीवरून शैलेश लक्ष्मीकांत लाड (रा. नेतर्डे) याच्या विरोधात बांदा पोलिसात मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत बांदा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी रामप्रसाद लाड हे शनिवारी 20 रोजी आपल्या नेतर्डे येथे घराच्या बाजूला सायंकाळी साफसफाई करीत होते. दरम्यान, साफसफाई करण्यासाठी आग घातली होती. दरम्यान, चुलतभाऊ शैलेश लाड यानी आपल्या माडाच्या झाडाजवळ आग घातल्याचा समज करून कोयता घेऊन शिवीगाळ करीत कोयता कंबरेकडे मारण्यासाठी उगारला. दरम्यान, फिर्यादीने रोखण्यासाठी हात घातला असता डाव्या हाताच्या करंगळीला कोयता लागून दुखापत झाली. याबाबत शनिवारी रात्री रामप्रसाद लाड यांनी बांदा पोलिसात तक्रार दिली. त्यावरून बांदा पोलिसात शैलेश लाड याच्या विरोधात मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ करीत आहेत.








