मुदतवाढ करण्याची दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनची मागणी : कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांना निवेदन
प्रतिनिधी / बेळगाव
राज्य सरकारने कोरोना काळात व्यवसाय बंद असल्याने विशेष पॅकेज जाहीर केले. कामगारांना नेंदणी करण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. परंतु संबंधीत वेबसाईट सर्व्हर डाऊनमुळे बंद असल्याने त्याचा फटका कामगारांना बसला. त्यामुळे नोंदणीसाठी वेळ वाढवून द्यावा, अशा मागणीचे निवेदन दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनतर्फे कामगार मंत्र्यांना शुक्रवारी देण्यात आले.
दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष वैभव वेर्णेकर यांनी यल्लापूर (जिल्हा कारवार) येथे कामगार मंत्री शिवराम हेब्बार यांची भेट घेतली. राज्य सरकारने कोरोना कालावधीत नुकसान झालेल्या कामगारांसाठी विशेष पॅकेज जाहीर केले. यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये काम करणाऱया कामगारांचा समावेश आहे. फुल ना फुलाची पाकळी म्हणून त्यांना ही मदत दिली जाणार आहे. यासाठी राज्य सरकारने वेबसाईटवरून नाव नोंदणी करण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी दिला होता. परंतु एकाचवेळी नोंदणी केली जात असल्याने सर्व्हर डाऊनची समस्या येत होती.
कामगार उपायुक्तांच्या निदर्शनास समस्या
सर्व्हर डाऊनमुळे अनेक कामगारांना नाव नोंदणीच करता आलेली नाही. यामुळे कामगारांमध्ये निराशा असून, नाव नोंदणीसाठी वेळ वाढवून द्यावा, अशी मागणी असोसिएशनने निवेदनाद्वारे केली होती. तसेच बेळगावचे कामगार उपायुक्त वेंकटेश यांनाही ही बाब निदर्शनास आणून देण्यात आली होती. या समस्येबाबत कामगार मंत्र्यांशी दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयांनी सविस्तर चर्चा केली.
कामगार मंत्र्यांचे आश्वासन…
सर्व्हर डाऊनची समस्या कामगार मंत्र्यांसमोर मांडल्यानंतर त्यांनी आपल्या विभागाच्या वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधला. तसेच कामगारांचे नुकसान होऊ नये यासाठी जुलैपर्यंत मुदत वाढविण्याचे आश्वासन दिले. याबाबत बैठक घेऊन लवकरच लेखी आदेश जाहीर करण्याचे आश्वासन त्यांनी असोसिएशनच्या पदाधिकाऱयांना दिले.









