नवी दिल्ली
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संघटना नॅस्कॉमच्या (नॅशनल असोसिएशन ऑफ सॉफ्टवेअर अँड सर्व्हिसेस कंपनीज) चेअरपर्सनपदी नुकतीच रेखा मेनन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदरची नियुक्ती आर्थिक वर्ष 2021-22 करीता करण्यात आली असून याआधी भारतात त्या ऍक्सेंचर कंपनीच्या वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या. नॅस्कॉमच्या इतिहासात 30 वर्षाच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच सदरचे पद एखाद्या महिलेला दिले असल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रवीण राव यांच्यानंतर मेनन या सदरचे पद सांभाळणार आहेत. याआधी संघटनेवर रेखा मेनन यांनी उपाध्यक्ष म्हणूनही यशस्वीपणे सेवा बजावली असल्याचे सांगण्यात येते.









