प्रसंगी न्यायालयात जाऊन डाव उधळणार
प्रतिनिधी/ पणजी
प्रसंगी न्यायालयातही जाणार, पण नॅशनल थिएटर इमारत विकण्याचे महापौर रोहित मोन्सेरात यांचे मनसुबे कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा निर्धार माजी महापौर तथा विद्यमान नगरसेवक उदय मडकईकर, सुरेंद्र फुर्तादो आणि ज्योएल आंद्राद यांनी व्यक्त केला आहे.
पणजीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शुक्रवारी घाईगडबडीत घेण्यात आलेल्या पणजी मनपाच्या बैठकीत विरोधकांना बोलण्याची संधी सुद्धा न देता सदर थिएटर विकण्याच्या योजनेस मान्यता देण्याचा महापौरांचा डाव होता. त्यामुळे पत्रकार परिषदेतून आम्ही हा विषय जनतेसमोर आणि खास करून पणजीवासियांसमोर मांडत आहोत, असे फुर्तादो म्हणाले. पणजी मनपाच्या इतिहासात असा नगराध्यक्ष किंवा महापौर आम्ही पाहिला नाही, असे सांगताना अशाप्रकारे पणजीतील प्रमुख व्यावसायिक जागा बिल्डरांच्या घशात घालू पाहणाऱयांची षडयंत्रे पणजीकरांनी उधळून लावावी, असे आवाहन फुर्तादो यांनी केले.
उदय मडकईकर यांनी बोलताना महापौर रोहित मोन्सेरात हे आपले वडील पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात आणि आई महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या पाठिंब्यानेच ही षडयंत्रे रचत असून बडय़ा बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी स्वतःच्या खुर्चीचा गैरवापर करत आहेत, असा आरोप केला. या गैरव्यवहारात मनपा आयुक्त त्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. त्यामुळे भविष्यात मनपात एखादा घोटाळा उघडकीस आल्यास त्याला आयुक्तही तेवढेच जबाबदार असतील, असा इशारा मडकईकर यांनी दिला.
शुक्रवारी झालेल्या बैठकीत आम्ही केवळ चारच विरोधक होतो. तरीही महापौर कुणाचेही म्हणणे ऐकून घेत नव्हते. कित्येक वर्षांपासून बंद असलेले सदर थिएटर आजही राव अँड कंपनी या भाडेकरूच्याच ताब्यात आहे. ते प्रकरण न्यायप्रविष्ठही आहे. त्याचा निकाल लागण्यासाठी आणखी काही वर्षे लागू शकतात. त्यामुळे अपिल मागे घेण्यासाठी भाडेकरूला समझोत्याचा प्रस्ताव दिला आहे. मनपा बैठकीत बहुमताच्या जोरावर आणि आयुक्तांच्या माध्यमातून त्याला मंजुरी देण्याचा खटाटोप महापौरांकडून करण्यात आला. त्याशिवाय अन्य कित्येक विषयांना कोणत्याही चर्चेविना मान्यता देण्याचाही प्रयत्न महापौरांकडून झाला व केवळ अर्ध्या तासातच बैठक गुंडाळण्यात आली, यावरून महापौर किती घाईत होते हे लक्षात येते, असे मडकईकर म्हणाले. पालिकेत सध्या मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार आणि लूट चालली असून पालिका बैठकीतील नोंदी सुद्धा नंतर बदलण्यात येतात, असा दावाही त्यांनी केला.
मोन्सेरात कुटुंबियांच्या घराणेशाहीला पणजीकर सध्या कंटाळले आहेत. बाबूश मोन्सेरात यांनी ताळगाव उध्द्वस्त केले आहे आणि आता पणजी संपविण्याचे काम सुरू आहे. या घराणेशाही विरोधात लवकरच काँग्रेसतर्फे आम्ही पणजी आणि ताळगाव भागात मतदारजागृती कार्यक्रम आयोजित करणार आहोत, अशी माहिती मडकईकर यांनी दिली. येत्या निवडणुकीत मतपेटीच्या माध्यमातून मतदारांनीच ही घराणेशाही संपवावी. अन्यथा पुढील काही वर्षात पणजीकरांसाठी पणजी शिल्लक राहणार नाही, असा इशारा मडकईकर यांनी दिला.









