वार्ताहर/ जमखंडी
बागलकोट जिल्हय़ात अतिवृष्टी व नद्यांच्या पूराने नुकसान झालेल्या भागाचा केंद्रीय अध्ययन पथकाने दौरा केला. कृष्णा, मलप्रभा, घटप्रभा या नद्यांना पूर आला होता. तसेच जिल्हय़ात पावसाने रस्ते, पूल, पिकाचे नुकसान झाले असून राज्य रस्ते प्रादेशिक कार्यालयाचे अधिक्षक अभियंतो सदानंद बाबू व ग्रामीण विकास मंत्रालयाचे सहाय्यक सचिव व्ही. पी. राजवेदी यांचा समावेश असलेल्या केंद्रीय अध्ययन पथकाने पाहणी केली.
बदामी तालुक्यातील गोवनकोप्प व कोण्णूर येथील रस्त्याची पाहणी केली. तसेच येथील शेतकरी होळेबसाप्पा मादियप्पनवर यांच्या शेतात मूग पिकाची पाहणी करून शेतकऱयांशी संवाद साधला. मूग लागवड अंदाजे 20 हजार रुपये खर्च करून करण्यात आली होती. व यंदा उत्तम पिक आले होते. व अंदाजे 60 हजार उत्पन्नाची रक्कम हाती येणार अशी अपेक्षा असताना पुराने पाणी फेरले असल्याची प्रतिक्रिया पथकासमोर व्यक्त केली तसेच हेब्बळी येथील शेती, हेस्कॉमचे नुकसान बागायत उत्पादनाचे नुकसान याची माहिती घेतली. बदामी येथील हॉटेल मयुरच्या सभागृहात जिल्हाधिकारी कॅप्टन डॉ. के. राजेंद्र यांनी जिल्हय़ात झालेल्या एकूण हानीचे सादरीकरण केले. जिल्हय़ात कृषी बागायत रस्ते पूल, हेस्कॉम आदींचे एकूण 837. 35 कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची माहिती दिली. मुधोळ तालुक्यातील मिर्जी, माचकनूर, रबकवी-बनहट्टी तालुक्यातील नंदागाव आदी चार ठिकाणी परिहार केंद्राची स्थापन करून 210 नागरिकांना आश्रय देण्यात आला होता व पुरात एक जनावराचा मृत्यू झाला होता. पुराने बाधित झालेल्या 215 कुटुंबांना प्रत्येकी 10 हजार प्रमाणे मदत देण्यात आली असून जिल्हय़ात 105 घरे संपूर्ण कोसळली तर 26 घरांचे मोठे नुकसान व 338 घरांचे थेडे नुकसान असे एकूण 469 घरांचे नुकसान झाल्याची माहिती दिली.
22473 हेक्टर शेती, 12388 हेक्टर बागायत क्षेत्र, 8.40 हेक्टर रेशीम असे एकूण 34869 हेक्टर प्रदेशातील उत्पादनाचे 374.87 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्हा पंचायतीच्या हद्दीतील 999.63 कि.मी. ग्रामीण रस्ते, 19 पिण्याच्या योजनेचे काम, 32 सेतू, आदीचे अंदाजे 26.70 कोटी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे हद्दीतील 94 कि.मी. चा राज्य रस्ता, 308 कि.मी. जिल्हा प्रमुख रस्ता, 54 पुल याचे अंदाजे 379.62 कोटी रुपयांचे नुकसान झाले तर 128 शाळा, 30 अंगणवाडय़ा, 2 समुदाय भवन याचे 4.26 कोटीची हानी झाली.
लघू पाटबंधारे खात्याचे विविध 86 कामांचे 31.84 कोटी रुपयांचे नुकसान झाले. नगरप्रदेशातील 140 कि.मी. रस्ते, हेस्कॉमचे 1851 विद्युत खांब, 471 ट्रान्सफॉर्मर, 69. 6 कि.मी. विद्यूत तार आदी 7.37 कोटीचे नुकसान झाले आदी सविस्तर माहिती पथकाला पुरविण्यात आली.
बागलकोट तालुक्यातील कलादगी, चिंचखंडी पूल, मुधोळ येथील यादवाड सेतू, सावळगी आदी ठिकाणी पाहणी केली. या प्रसंगी जिल्हा सचिव शिवयोगी कळसद जिल्हा पंचायत मुख्य कार्यनिर्वाहक अधिकारी टी. भूबालन, जिल्हा पोलीस प्रमुख लोकेश जगलासर, कृषी निर्देशिका डॉ. चेतना पाटील, उपनिर्देशक कोंगवाड आदी उपस्थित होते.









