अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाब नॅशनल बँकेला 14 हजार कोटींचा चुना लावून विदेशात फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदीची 329 कोटीची संपत्ती अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जप्त केली आहे. फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. या संपत्तीमध्ये मुंबईसह लंडन आणि संयुक्त अरब अमिरातीमधील आलिशान फ्लॅटचा समावेश आहे. मुंबईत वरळी येथे साकारलेला ‘समुद्र महाल’ हा फ्लॅट, अलिबाग किनाऱयावरील फार्महाऊस, राजस्थान जैसलमेरमधील मॉल, लंडन-यूएईमधील फ्लॅट्स असा बऱयाच बहुमूल्य मालमत्ता नव्याने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये जप्त केल्या. यापूर्वीही अशाचप्रकारे कारवाई करत त्याची सव्वादोन हजार कोटींहून अधिक किंमतीची मालमत्ता जप्त केली आहे.
मुंबईतील विशेष न्यायालयाने 8 जूनला ईडीला संपत्ती जप्त करण्याची परवानगी दिली होती. त्यापूर्वी मागील वर्षी डिसेंबरमध्ये नीरव मोदीला फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून घोषित करण्यात आले होते. न्यायालयाच्या या निर्देशानंतर त्याच्याविरोधातील कारवाईने वेग घेतला होता. मागील महिन्यात नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीशी संबंधित कंपन्यांमधील तब्बल 2 हजार 300 किलोपेक्षा अधिक सोने भारतात आणण्यात आले होते. सदर ऐवज हाँगकाँगमधील एका लॉजिस्टिक कंपनीच्या गोदामात ठेवण्यात आला होता. या ऐवजाची किंमत जवळपास 1 हजार 350 कोटी रुपयांहूनही अधिक आहे.








