प्रशिक्षण व स्पर्धेत भाग घेण्यासाठी पोर्तुगालमध्ये दाखल, गुरुवारी व्यावसायिक स्पर्धेत फॉर्म आजमावणार
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
ऑलिम्पिक पात्र भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा पोर्तुगालमध्ये दाखल झाला असून लिस्बन येथे गुरुवार दि. 10 रोजी होणाऱया स्पर्धेत तो सहभागी होत आहे. नीरज या निमित्ताने वर्षभरानंतर प्रथमच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत आपला फॉर्म आजमावून पाहणार आहे.
नीरज चोप्रा गतवर्षी जानेवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतील स्पर्धेच्या माध्यमातून टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला. मात्र, त्यानंतर त्याने एकही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळली नाही. रविवारी तो लिस्बनमध्ये दाखल झाला असून लिस्बन युनिव्हर्सिटी स्टेडियमवर आयोजित स्पर्धेत सहभागी होणार आहे.
‘नीरज लिस्बनमध्ये प्रशिक्षण घेईल. शिवाय, काही स्पर्धांमध्ये सहभागी देखील होईल. गुरुवारी युनिव्हर्सिटी स्टेडियमवरील स्पर्धेच्या माध्यमातून त्याची मोहीम सुरु होत आहे. दि. 22 जून रोजी स्वीडनमध्ये आयोजित कार्लस्टॅड ग्रां प्रि स्पर्धेत देखील तो भाग घेण्याची शक्यता आहे. अनेक देशांनी भारतातून येणाऱया प्रवाशांवर कडक क्वारन्टाईनचे निर्बंध लादले आहेत. त्यामुळे, आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे’, असे नीरजच्या एका निकटवर्तियाने वृत्तसंस्थेला सांगितले.
नीरज चोप्राचे प्रायोजक जेएसडब्ल्यू स्टील कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय अधिकारी पार्थ जिंदाल यांनी नीरज व बजरंग पुनिया हे दोघेही पोर्तुगालमध्ये पोहोचले असल्याचे ट्वीटरवर सांगितले. क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी यासाठी जेएसडब्ल्यूने केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानले.
नीरजने काहीच आठवडय़ांपूर्वी वृत्तसंस्थेशी संवाद साधत वर्षभरापासून कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता न आल्याने त्याचा आपल्या ऑलिम्पिक तयारीवर विपरीत परिणाम होत आहे, असे नमूद केले होते. त्याची तातडीने दखल घेत नीरज प्रत्यक्ष ऑलिम्पिकपूर्वी काही स्पर्धांमध्ये सहभागी होईल, जेणेकरुन त्याला मॅचप्रॅक्टिस मिळू शकेल, याची तजवीज केली गेली आहे.
23 वर्षीय नीरज मागील सोमवारीच युरोपला रवाना होणे अपेक्षित होते. पण, व्हिसा मिळण्यात उशीर झाल्याने त्याला आपला प्रवास लांबणीवर टाकावा लागला. चोप्राने मार्चमध्ये पतियाळात झालेल्या इंडियन ग्रां प्रि 3 स्पर्धेत 88.07 मीटर्सची भालाफेक करत आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडला होता. त्याने गतवर्षी दक्षिण आफ्रिकेतील पोश्चेफस्ट्रूम येथे 87.86 मीटर्सची फेक करत ऑलिम्पिक पात्रता मिळवली होती. ऑलिम्पिक पात्रतेसाठी 85 मीटर्स ही पात्रतेची मर्यादा ठेवण्यात आली होती. द. आफ्रिकेतील त्या स्पर्धेनंतर नीरजने काही काळ ग्रीसमध्ये प्रशिक्षण घेतले. पुढे मार्चमध्ये तो भारतात परतला आणि त्यानंतर काहीच दिवसात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाले. यानंतर नीरज एकाही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ शकलेला नाही.









