वर्ल्ड अॅथलेटिक्समध्ये जिंकले प्रथमच गोल्ड : पाकिस्तानच्या नदीमला रौप्य तर वेल्डेचला कांस्यपदक
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या नीरज चोप्राने 88.17 मीटर भाला फेक करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. विशेष म्हणजे, वर्ल्ड अॅथलेटिक्समधील त्याचे हे दुसरे पदक आहे. यापूर्वी 2022 मध्ये त्याने रौप्यपदक जिंकले होते. पण यंदा मात्र त्याने शानदार कामगिरी करत गोल्ड जिंकले. यासह नीरज हा वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारा पहिला भारतीय ठरला. पाकिस्तानच्या अर्शद नदीमला रौप्य तर जर्मनीच्या वेल्डेचला कांस्यपदक मिळाले. नीरजच्या या शानदार कामगिरीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

अंतिम फेरीत नीरजचा पहिला प्रयत्न फॉल गेला पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने 88.17 मीटर भाला फेकत आपणच खरे विजयाचे दावेदार असल्याचे सिद्ध केले. यानंतर त्याने तिसऱ्या प्रयत्नात 86.32, चौथ्या प्रयत्नात 84.64, पाचव्या प्रयत्नात 87.73 तर सहाव्या प्रयत्नात 83.98 मीटर भाला फेकला. पाकिस्तानच्या नदीमने पहिल्या प्रयत्नात 87.82 मीटर भाला फेक करत नीरजला आव्हान दिले खरे पण नंतरच्या प्रयत्नात त्याला नीरजच्या जवळपासही फिरकता आले नाही. अखेरीस त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जर्मनीच्या वेल्डेचने पाचव्या प्रयत्नात 86.87 मीटर अंतर गाठून कांस्यपदक जिंकले. याशिवाय, भारताच्या किशोर मीनाला पाचव्या तर डीपी मनूला सहाव्या स्थानी समाधान मानावे लागले.
नीरजची सुवर्णमय कामगिरी
गोल्डन बॉय नीरजने 2022 च्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. यानंतर यंदाच्या वर्षी या स्पर्धेत नीरजने ऐतिहासिक कामगिरी साकारत प्रथमच सुवर्ण जिंकले. नीरजच्या या यशामुळे जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत प्रथमच भारतीय संघाला मोठे यश मिळाले आहे. याआधी नीरजने डायमंड लीग, आशियाई स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्याने शानदार कामगिरी साकारत सुवर्णपदक जिंकले होते.









