जलस्रोतमंत्री फिलीप नेरी यांचे उद्गार : आंबे-धुलैय पदपुलाची पायाभरणी
वार्ताहर / दाभाळ
धारबांदोडा तालुक्यावर निसर्गाचा वरदहस्त आहे. येथील नैसर्गिक संपत्ती ही दैवी देणगी असून तिचे रक्षण करणे हे सर्वांचे कर्तव्य ठरते. हे जरी खरे असले, तरी येथील गावांचा विकास होणे तेवढेच आवश्यक आहे. नैसर्गिक संपत्तीला कोणतीच बाधा न आणता सरकार येथील गावांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करीत आहे व हेच या सरकारचे मुख्य धोरण असल्याचे जलस्रोतमंत्री फिलीप नेरी यांनी सांगितले.
धारबांदोडा पंचायत क्षेत्रातील आंबे धुलैय या गावात दूधसागर नदीवर नव्याने बांधण्यात येणाऱया पदपूलाची पायाभरणी मंत्री फिलीप नेरी यांच्याहस्ते मंगळवारी झाली. या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाममंत्री तथा स्थानिक आमदार दीपक पाऊसकर, दक्षिण गोवा जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर, धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य सुधा गांवकर, धारबांदोडा पंचायतीच्या सरपंच स्वाती तिळवे, किर्लपाल दाभाळच्या सरपंच शकुंतला गावकर, सावर्डेचे सरपंच संदीप पाऊसकर, धारबांदोडाचे उपसरपंच परेश खुटकर, पंचसदस्य सुनीता गांवकर, विनायक गांवकर, किर्लपाल दाभाळचे उपसरपंच शशिकांत गावकर, पंच सदस्य रमाकांत गावकर, अनिता प्रभू, चंदा गावकर, जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंते श्रीकांत पाटील, व्यवस्थापक प्रमोद बदामी, कार्यकारी अभियंते कृष्णकांत पाटील, सहाय्यक अभियंते मोहन रायकर, कनिष्ठ अभियंते श्रीनाथ सी. व्ही, जमीनदार रमेश प्रभू वेळगेकर आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या जल जीवन योजनेतंर्गत राज्य सरकार पाण्याचे योग्यरित्या व्यवस्थापन करीत आहे. येणाऱया काळात त्याचा भरपूर लाभ येथील जनतेला होणार असल्याचे मंत्री फिलीप नेरी पुढे बोलताना म्हणाले. या नदीवर बांधण्यात येणारा हा पूल धारबांदोडा व दाभाळ गावांना जोडणारा महत्त्वाचा दुवा असून कित्येक वर्षांची नागरिकांची मागणी पूर्णत्वाकडे येत आहे. पूल झाल्यानंतर कचरा थेट नदीत फेकून देऊ नका असे आवाहनही त्यांनी केले.
अखेर पुलाचे स्वप्न दृष्टीपथास
आंबे धुलैय व दाभाळ दोन गावे हाकेच्या अंतरावर असली तरी पावसाळय़ात नदीला येणाऱया पुरामुळे दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे अंदाजे 5-6 कि. मीटर अंतराचा वळसा घालून आंबे धुलैय गावातील लोकांना दाभाळला यावे लागते. नदी ओलांडायची झाल्यास होडीतून धोकादायक प्रवास करावा लागत होता. त्यासाठी ग्रामस्थांनी नदीवर लहान पदपूल बांधण्याची मागणी सरकारकडे केली होती. कित्येक वर्षांपासूनची ही मागणी प्रलंबित होती, ती आज साकार होत असल्याने येथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
72 मिटर लांब व 2.70 मिटर रुंदी असलेला हा पदपूल अंदाजे रु. 2 कोटी 88 लाख रुपये खर्चून बांधण्यात येणार असून लहान चारचाकी वाहने त्यावरुन नेण्याची सोय असेल. मे अखेरपर्यंत या पदपुलाचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
धारबांदोडा तालुक्यात इको पर्यटनाला वाव : मंत्री दीपक पाऊसकर
आंबे धुलैयवासियांची कित्येक वर्षाची पदपुलाची मागणी आज साकार होत आहे. ही समाधानाची गोष्ट असून येणाऱया काळात येथील सर्व समस्या टप्प्याटप्प्याने सोडविण्याचा आपला प्रयत्न राहील असे बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यावेळी बोलताना म्हणाले. येथील बंधाऱयाजवळ 1.5 एमएलडी पाणी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात केली जाणार असून त्यामुळे गावातील लोकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले. धारबांदोडा तालुक्यात इको पर्यटन व्यवसायाला खूप वाव असून येथील युवकांनी या क्षेत्राकडे वळण्याचा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
जमीन मालक रमेश वेळगेकर यांनी नदीच्या दोन्ही बाजुंनी संरक्षक कठडा उभारण्याची मागणी केली. बंधारा बांधून पाणी साठवल्यानंतर दोन्ही बाजूची माती ओलसर होऊन खचण्याची भिती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
सुवर्णा तेंडुलकर, सुधा गांवकर, स्वाती तिळवे यांनी यांची भाषणे झाली. प्रास्ताविक श्रीकांत पाटील यांनी केले. सूत्रसंचालन सर्वानंद देसाई यांनी केले तर कृष्णकांत पाटील यांनी आभार मानले.









