उत्तराखंडच्या चमोली जिह्यात नंदादेवी हीमकडय़ाचा काही भाग कोसळून आलेल्या महाप्रलयाने धौली गंगा, ऋषी गंगा आणि अलकनंदा या गंगेच्या उपनद्यांना अचानक आलेला महापूर आणि त्यात दोन जलविद्युत प्रकल्पांसह त्यावर काम करणारे शेकडो मजूर वाहून जाणे इतकेच या नुकसानीचे स्वरूप नाही. ग्लोबल वॉर्मिंगमुळे आलेल्या एका महासंकटाचा हा एक भाग आहे. त्यामुळे तो केवळ उत्तराखंड किंवा भारतापुरता मर्यादित नसून संपूर्ण जगावर होणाऱया परिणामाची ती एक चुणूक आहे. काश्मीर आणि केरळमध्ये अचानक संपूर्ण राज्य उद्ध्वस्त व्हावे असा महापूर येतो, चेन्नई, मुंबईमध्ये चक्रीवादळ धडकण्याचा धोका निर्माण होतो, काझीरंगा आणि गीरच्या जंगलात महापुराचा प्रलय तिथली वनसंपत्ती नष्ट करण्यास कारणीभूत ठरतो, कोकणात वादळी वाऱयाचा तडाखा बसतो, पश्चिम महाराष्ट्रात महापुराचे संकट येते, विदर्भ, मराठवाडय़ात अवकाळी पाऊस पडतो, अचानक देशाच्या विविध भागात दुष्काळ पडतो या घटना आणि त्यामध्ये होणारे नुकसान हे केवळ त्या भागापुरते मर्यादित असत नाही. त्याने जशी राष्ट्रीय हानी होते तशीच ती जागतिकसुद्धा असते. उत्तराखंडमध्ये आता चुकीच्या काळात हिमस्खलन कसे झाले असा प्रश्न या क्षेत्रातील अभ्यासकांना पडला आहे. दुर्गम भागात ही दुर्घटना घडल्याने नुकसान तुलनेने कमी झाले आहे. मात्र 1991, 98, 99, 2013 या काळात भूकंप, भूस्खलन अशा घटना घडत राहिल्या आहेत. जून 2013 मध्ये चारधाम यात्रेदरम्यान केदारनाथ येथे अचानक ढगफुटी होऊन पूर आले, भूस्खलन झाले. 5,700 लोकांसह अनेक पूल आणि रस्ते वाहून गेले. देश-विदेशातील जवळपास तीन लाख लोक केदारनाथमध्ये अडकल्याने ती दुर्घटना जगभर चर्चेत होती. आठ वर्षांनी घडलेल्या या घटनेने जग हादरले आहे. शतकात कधीतरी अशी एखादी घटना घडते असे म्हणून याकडे आता दुर्लक्ष करता येणार नाही, हे सलगच्या दुर्घटना सांगत आहेत. एका अभ्यासानुसार देशात 1970 ते 2005 या 35 वर्षात अशा 256 दुर्घटना घडल्या तर 2005 ते 2020 या अवघ्या 15 वर्षात 310 दुर्घटना घडल्या आहेत. 2005 सालापर्यंत भारतात 80 जिल्हे अत्यंत दुष्काळी म्हणून ओळखले जात होते. 25 जिह्यांमध्ये चक्रीवादळाचे दुष्काळाचे आणि महापुराचे संकट वारंवार यायचे. आता भारतातील 75 टक्के जिह्यांमध्ये हवामान बदलाने अशा घटनांची वारंवारता वाढत चालली आहे. कुठेही दुष्काळ पडतो, महापूर येतो, एकाच दिवसात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा असा तीन ऋतूंचा अनुभव येतो. याचे कारण हे शतक सुरू होण्यापूर्वीच अभ्यासकांनी दिले होते. नैसर्गिक साधन संपत्तीची विकासाच्या नावाखाली होणारी प्रचंड लुबाडणूक, ओरबाडून घेण्याची वृत्ती यामुळे गेल्या शतकाचा अंत होण्यापूर्वीच जागतिक तापमान वाढीची चिंता व्यक्त केली जाऊ लागली होती. आता जगभरात अवेळी बर्फ वितळणे, त्यामुळे हवामानात बदल होणे, समुद्रातील पाण्याची उंची वाढणे, पाठोपाठ वादळ, वाढती उष्णता, जंगलांना आग लागणे अशाप्रकारे तापमान असंतुलित होऊ लागले. गेल्या 7 वर्षात झालेल्या हरित गृह वायू उत्सर्जनाने जगाला अधिक संकटात टाकले. आता अंटार्टिकावरील बर्फ चुकीच्या वेळी वितळून समुद्रात मिळतो आहे. समुद्राची एक सेंटिमीटरने वाढलेली उंची एक लाख लोकांना विस्थापित करत आहे. 2050 सालापर्यंत जगातील 30 कोटी लोक या समुद्राच्या पाण्यात वाहून जातील अशी भीती व्यक्त केली जात आहे. दक्षिण आशियाला म्हणजेच चीन, जपान, बांगलादेश आणि भारत यांना याची किंमत मोजावी लागेल. मुंबईसारख्या जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम करणाऱया शहरातील अनेक भाग पाण्यात बुडून जातील, मालदीवसारख्या बेटांचे देश पाण्यात कायमचे नाहीसे होतील असे इशारे दिले जात आहेत. भारताने हे गांभीर्याने घेतले पाहिजे. कारण, जगातील पाच सर्वात प्रदूषित देशात भारत मोडतो. विकासासाठी पर्यावरणाशी खेळ आणि हरितवायूंचे उत्सर्जन यामध्ये आपला वाटा मोठा आहे. भविष्यात तर ऑक्सिजनचा पुरवठादेखील कमी झालेला पहायला मिळू शकतो. यंदाच्याच वर्षाचा विचार केला तर काश्मिरात विक्रमी बर्फवृष्टी झाली. पंजाब आणि दिल्लीत कडाक्मयाची थंडी होती तर मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि इतर अनेक राज्यात थंडीच बेपत्ता झाल्याचे दिसून आले. 2020 हे वर्ष हे जगातील सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे. या आणि अशाच काही कारणांमुळे उत्तराखंडमध्ये एखादा मोठा हीमकडा कोसळेल आणि अशी दुर्घटना घडेल असे कोणाच्या ध्यानीमनीही आले नव्हते. त्या आपत्तीला आता देशातील सर्वोच्च यंत्रणा तोंड देत आहे. एका राज्यातून दुसऱया राज्यात नुकसानीतून सावरण्यासाठी आणि जीव वाचवण्यासाठी धावत राहणे हेच या यंत्रणांचे मोठे काम बनले आहे. अनेक भागात पाणीटंचाई, दुष्काळ अशा समस्या नव्याने सुरू झालेल्या आहेत. त्सुनामीनंतर जगातील अनेक बेटे समुद्राच्या पाण्याखाली गेली तर कोकणात देवगड तालुक्मयात एक नवीन बेट उदयाला आले. बदलत्या निसर्गाचे हे सर्व परिणाम आपल्याला संकटाचे इशाऱयांवर इशारे देत आहेत. आता जर जीवनशैली सुधारली नाही तर अनपेक्षित संकट केव्हाही आपल्या दारात उभे असेल आणि त्यातून वाचणे फारच मुश्कील आहे हे सांगायला आता हवामान तज्ञांची गरज राहिलेली नाही. तसेच ही संकटे येऊ नयेत म्हणून काय केले पाहिजे हेही सांगायची गरज नाही.
**EDS: BEST QUALITY AVAILABLE** Chamoli: Avalanche after a glacier broke off in Joshimath in Uttarakhands Chamoli district causing a massive flood in the Dhauli Ganga river, Sunday, Feb. 7, 2021. More than 150 labourers working at the Rishi Ganga power project may have been directly affected (PTI Photo)(PTI02_07_2021_000059B)







