ऑनलाईन टीम / मुंबई :
निसर्ग चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर धडकले असून, काही वेळातच ते अलिबागच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. अलिबागमध्ये प्रवेश केल्यानंतर हे वादळ मुंबई तसेच ठाणे जिल्ह्यात प्रवेश करेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.सुरक्षेच्या कारणास्तव मुंबईतील वेगवेगळया भागांमध्ये एनडीआरएफच्या आठ आणि नौदलाच्या पाच तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. कुलाबा, वरळी, वांद्रे, मालाड, बोरीवली या भागात प्रत्येकी एक आणि अंधेरीत तीन तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत.
वादळाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम किनारपट्टीलगतच्या 40 हजार लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मुंबई, पालघरसह किनारपट्टीवरील लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईतील 6 समुद्रकिनाऱ्यावर 93 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.









