जिल्हाधिकाऱयांशी माजी नगरसेवकांची चर्चा
बेळगाव : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचा अवमान केल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे निषेध सभा घेण्यात आली. त्या सभेनंतर निष्पाप तरुणांना अटक करण्यात आली. शहरात अनेक ठिकाणी धरपकड करून शाळकरी विद्यार्थ्यांना पकडण्यात आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर आहे. तेव्हा तातडीने त्या सर्वांची सुटका करावी. याचबरोबर राजद्रोहासारखा गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी माजी नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांच्याबरोबर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी त्यांनी निश्चितच याबाबत विचारविनिमय केला जाईल, असे सांगितले. कॉलेजमध्ये त्या मुलांची परीक्षा आहे. त्यांची तातडीने सुटका होणे गरजेचे आहे. त्यासाठी वेळीच विचार करा व सर्व कार्यकर्त्यांची मुक्तता करा, अशी मागणी केली आहे.
पोलीस आयुक्तांनाही याबाबत निवेदन द्या, अशी सूचना जिल्हाधिकाऱयांनी केली आहे. चर्चा करण्यासाठी माजी महापौर ऍड. नागेश सातेरी, किरण सायनाक, शिवाजी सुंठकर, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेवक नेताजी जाधव, ऍड. रतन मासेकर, विनय गुंजटकर यांच्यासह इतर नगरसेवक उपस्थित होते.









