शहर म. ए. समितीकडून धीर देण्याचा प्रयत्न : आमच्या मुलांनी कोणताही गुन्हा केलेला नाही
प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचा अवमान करण्यात आला. याचा निषेध नोंदविण्यासाठी धर्मवीर संभाजी चौकात आलेल्या निष्पाप तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करून हिंडलगा कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली. त्यामुळे त्यांची कुटुंबीय चिंतेत आहेत. त्या निष्पाप तरुणांच्या कुटुंबीयांची शहर म. ए. समितीने भेट घेऊन धीर देण्याचा प्रयत्न केला.
सीमालढय़ाची धार कमी करण्यासाठी निष्पाप युवकांवर गुन्हे घालण्यात आले. उच्चशिक्षण घेणाऱया तरुणांना विनाकारण कारागृहात पाठविण्यात आले. सध्या आम्हाला जो नाहक त्रास दिला जात आहे, त्याविरोधात आम्ही लढा देऊ, जोवर हे तरुण कारागृहातून घरी परतत नाहीत तोवर सर्वतोपरी सहकार्य करू, असा विश्वास शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी कुटुंबीयांशी भेटून व्यक्त केला.
वकिलांशी आम्ही संपर्कात
गुन्हा दाखल झालेल्या तरुणांना लवकरात लवकर जामीन मंजूर करून घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासंदर्भात काम करणाऱया वकिलांशी आम्ही संपर्कात आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी कोणतीही काळजी करू नये. तरुण निष्पाप असून हा खटला लवकरात लवकर निकाली येवून निर्दोष म्हणून सुटका होईल, असा विश्वास म. ए. समितीच्या पदाधिकाऱयांनी दिला.
महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच नोकरी-व्यवसाय करणाऱया तरुणांना या प्रकरणात नाहक गोवण्यात आले आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना काळजी आहे. त्यामुळे त्यांना धीर देण्याचा प्रयत्न शहर म. ए. समितीने केला. आमच्या मुलांनी कोणताही गुन्हा केलेला नसून ते निर्दोष असल्याचा दावा पालकांनी केला.
यावेळी माजी नगरसेवक नेताजी जाधव, माजी उपमहापौर रेणु किल्लेकर, माजी नगरसेविका सुधा भातकांडे, वर्षा आजरेकर, माजी नगरसेवक मनोहर हलगेकर, गीता हलगेकर, रवी हुलजी, परशुराम कोकितकर, पुंडलिक चव्हाण, बाळाप्पा सुतार यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.









