कालपी मतदारसंघात भाजप नेत्याला दिले चिन्ह
उत्तरप्रदेश निवडणुकीत भाजपसोबत आघाडी करून मैदानात उतरलेल्या निषाद पक्षाने स्वतःच्या 4 उमेदवारांची घोषणा केली आहे. कालपी मतदारसंघात पक्षाने छोटे सिंह यांना उमेदवारी जाहीर केली आहे. छोटे सिंह यांनी अलिकडेच बसपला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता. म्हणजेच या मतदारसंघात चिन्ह निषाद पक्षाचे राहणार असले तरीही निवडणूक लढण्याची संधी भाजप नेत्याला देण्यात आली आहे. तर आंबडेकरनगर जिल्हय़ातील कटेहारी मतदारसंघात अवधेश द्विवेदी यांना उमेदवारी मिळाली आहे.
डॉ. असीम कुमार यांना तमकुहीराज मतदारसंघात उमेदवारी मिळाली आहे. याचबरोबर प्रशांत सिंह यांना अतरौलिया मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे. भाजपकडून 15 जागा देण्यात येणार असल्याचा दावा निषाद पक्षाकडून करण्यात आला होता. परंतु आतापर्यंत भाजपकडून जागावाटपासंबंधी कुठलेच वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी अपना दल आणि निषाद पक्षासोबत आघाडीची घोषणा केली होती. सध्या निषाद पक्षाकडून आणखीन काही उमेदवारांची घोषणा केली जाणार असल्याचे मानले जात आहे. मल्लाह आणि कोळी समुदाय हा आपला पाठिराखा असल्याचे निषाद पक्षाचा दावा आहे. या समुदायांचे मुद्दे या पक्षाचे अध्यक्ष संजय निषाद हे उपस्थित करत राहिले आहेत. तर मागील वेळी भाजपसोबत आघाडी केलेले सुहेलदेव भारतीय समाज पक्षाचे नेते ओमप्रकाश राजभर हे यावेळी अखिलेश यादवांच्या गोटात शिरले आहेत.









