प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या लक्ष्मी टेकडी परिसरात अवैध व्यवसाय राजरोसपणे सुरु आहेत. ते व्यवसाय बाहेरुन आलेले झोपडपट्टी दादा मंडळी करत असून त्यांनी मांडलेल्या उच्छादामुळे या परिसराचे सामाजिक संतूलन बिघडत आहे. पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा शहर पोलीस ठाणे यांच्याकडे अनेकवेळा तक्रारी अर्ज येथील नागरिकांनी करुनही पोलिसांकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे पोलिसांचा वचक कमी झाला आहे काय?, अशी चर्चा सुरु झालेली आहे.
शहरात अवैध व्यवसायाचे चांगलेच पेव फुटले आहेत. विशेष करुन लक्ष्मी टेकडीवर अवैध व्यवसाय मोठया प्रमाणावर सुरु आहेत. तेथील अनेकांनी पोलिसांना लेखी स्वरुपात तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनाही कोठे काय चालते याचा पत्ता आहे. परंतु कोणतीही कार्यवाही होत नाही. अनेकदा तक्रारी होवूनही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने लक्ष्मी टेकडी परिसरात अवैध व्यवसायिकांचा सुळसुळाट झालेला आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीची दखल पोलीस विभागाकडून घेतली जात नसल्याने पोलिसांचा धाक अवैध व्यवसाय करणाऱयांवर राहिला आहे काय?, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
गृहराज्यमंत्री साहेब सदरबाजारात येथे आहेत अवैध व्यवसाय
राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई हे अतिशय चांगले काम करत आहेत. ते सतत जाहीरपणे सांगतात की कोणत्याही तक्रारीची लगेच दखल घेतली जाते. कार्यवाही केली जाते. मग सातारा शहरातील सदरबाजार या भागात पोलिसांकडे अवैध व्यवसायाबाबत तक्रार करुनही का कारवाई होत नाही असा प्रश्न सदरबाजारमधील नागरिक उपस्थित करत आहेत. सदरबाजारमध्ये भिमाबाई आंबेडकर चौकात अवैध दारुचा व्यवसाय सुरु आहे. श्री.छ.राजमाता सुमित्राराजे भोसले वाचनालयाच्या परिसरात पत्त्या आणि मटका चालतो. लक्ष्मी टेकडी येथील लक्ष्मी मंदिरासमोर टपरीत खुलेआमपणे दारुची विक्री केली जाते. लक्ष्मी टेकडीतील पाण्याच्या टाकीजवळ मटका घेतला जातो. यावर कोणतीही कारवाई केली जात नाही. अवैद्य व्यवसाय करणाऱयांवर झोपडपट्टी दादा ऍक्टनुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे.








