प्रतिनिधी / ओरोस:
सेवानिवृत्त शिक्षकांना निवृत्तीनंतर प्रशिक्षण पूर्ण करण्याची संधी देऊन चुकीच्या पद्धतीने निवड श्रेणीचा लाभ देणाऱया आणि ज्यांचे प्रशिक्षणच झाले नाही, अशा शिक्षकांच्या प्रशिक्षण झाल्याबाबतच्या खोटय़ा तारखा नोंदवून टिपणी सादर करणाऱया संबंधित सर्व तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन छेडले.
24 वर्षे एकाच पदावर कार्यरत असलेल्या शिक्षकाला निवड श्रेणीचा लाभ देण्यात येतो. मात्र यासाठी त्याला खात्यांतर्गत प्रशिक्षणाची अट घालण्यात आली आहे. दरम्यान हे प्रशिक्षण अनेक शिक्षकांनी पूर्ण केले नसल्याचे कारण देत त्यांना निवड श्रेणीच्या लाभापासून वंचित ठेवण्यात आले असल्याचा आरोप काही निवृत्त प्राथमिक शिक्षकांनी केला.
प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करण्याबाबत शिक्षण खात्याचे तत्कालीन अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचा गंभीर आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. शासनाकडून निश्चित करून देण्यात आलेला प्रशिक्षण कार्यक्रम वेळीच व योग्य प्रकारे न राबविल्यामुळे त्या शिक्षकांच्या आर्थिक नुकसानीस ते अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र काही शिक्षकांना चुकीच्या पद्धतीने लाभ देण्यात आला असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. काही शिक्षकांना निवृत्तीनंतर सेवांतर्गत प्रशिक्षण देऊन त्यांची निवडश्रेणी बाबतची अट पूर्ण करून घेण्यात आली. प्रशिक्षणासाठी बेकायदेशीररित्या कार्यमुक्त करून पुन्हा हजर केल्याचे दाखवण्यात आले. सेवानिवृत्तीनंतरच्या दिनांकाला प्राप्त करण्यात आलेल्या अर्हता मूळ पुस्तकात बेकायदेशीरपणे नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान निवडश्रेणी मंजुरीच्या आदेशानंतर त्यात झालेल्या चुका लेखी स्वरुपात निदर्शनास आणूनही या आदेशा स्थगिती देण्यात आलेली नाही. वेतन निश्चिती पडताळणी थांबण्याबाबत आदेश देणे व कशाचीही शहानिशा न करता पुन्हा मंजुरी देण्यात येणे, या बाबी अनाकलनीय असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले.
निवृत्त प्राथमिक शिक्षक चंद्रकांत अणावकर, सुरेश पेडणेकर, सुधाकर देवस्थळी, भानू तळगावकर, सोनू नाईक, आनंद पेडणेकर, कैवल्य पवार आदींनी छेडलेल्या या धरणे आंदोलनाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, कुडाळ तालुका अध्यक्ष प्रसाद वारंग, समितीचे माजी जिल्हा अध्यक्ष नंदकुमार राणे आदींनी पाठिंबा दिला. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कल्याण महासंघाचे अतिरिक्त महासचिव रावजी यादव यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेत जाहीर पाठिंबा व्यक्त केला.









