मुजफ्फरपूर प्रकरणी सीबीआयची स्पष्टोक्ती : सर्वोच्च न्यायालयाला दिली माहिती
नवी दिल्ली
बिहारच्या मुजफ्फरपूर निवारा केंद्रातील कुठल्याच मुलीची हत्या झालेली नाही. निवारा केंद्रात राहत असलेल्या सर्व 35 मुली जिवंत आढळून आल्या आहेत, असे सीबीआयने सर्वोच्च न्यायालयाला बुधवारी सांगितले आहे. महाधिवक्ते के.के. वेणुगोपाल यांनी मुजफ्फरपूरसह बिहारमधील सर्व 17 निवारा केंद्रांचा तपास पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवारा केंद्रातील मुलींवर झालेल्या अत्याचाराची दखल घेत सीबीआयला चौकशीचा आदेश दिला होता.
मुजफ्फरपूर निवारा केंद्रात राहणाऱया मुलींनी काही जणींची हत्या झाल्याचा आरोप केला होता. या आरोपाच्या पार्श्वभूमीवर निवारा केंद्रांच्या परिसरात खोदाई करण्यात आली असता काहीच सापडले नव्हते.
सीबीआयच्या तपासात बिहारच्या 17 निवारा केंद्रांमध्ये मुलींचे लैंगिक शोषण तसेच छळाप्रकरणी अधिकाऱयांचा निष्काळजीपणा उघड झाला होता. तपास यंत्रणेने 25 जिल्हादंडाधिकारी तसेच अन्य 46 अधिकाऱयांच्या विरोधात कठोर विभागीय कारवाईची शिफारस केली आहे. तर बिहारमधील 52 स्वयंसेवी संस्थांना त्वरित काळय़ा यादीत समाविष्ट करण्याची सूचना सीबीआयने केली आहे.
मुजफ्फरपूरच्या निवारा केंद्रातील मुलींवर होत असलेल्या अत्याचाराचा खुलासा फेब्रुवारी 2018 मध्ये झालेल्या सामाजिक लेखापरीक्षणातून झाला होता. टीआयएसएसच्या ‘कोशिश’ या संस्थेने निवारा केंद्रांमध्ये सामाजिक लेखापरीक्षण केले होते. निवारा केंद्रातील मुलींवर होणारे अत्याचार या संस्थेनेच उघडकीस आणले होते.









