विजापूरच्या लमाणी कामगारांनी खोदायला घेतली विहीर : लॉकडाऊनमुळे 16 कामगार बोर्डवेतील निवारा केंदात वास्तव्यास : न्यू इंग्लिश स्कूलच्या आवारात आहे कोरडी विहीर : झऱयाच्या रुपाने दिसलाय आशेचा किरण : कुडाळचे उमेश गाळवणकरही धावले मदतीला
स्वप्नील वरवडेकर / कणकवली:
‘तहान लागल्यावर विहीर खोदणे’ हा आपल्याकडील तसा प्रचलित वाप्रचार. कारण, जोपर्यंत तहान आहे, तोपर्यंत पाण्याची गरज भासणारच! त्यामुळे पाण्यापासून वंचित राहिलेल्या, ‘लॉकडाऊन’मुळे शासनाने बोर्डवे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे कार्यान्वित केलेल्या निवारा केंद्रात विसावलेल्या परप्रांतिय लमाणी कामगारांनी अक्षरश: विहीर खोदून तहान भागविण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या प्रयत्नांना एका झऱयाच्या रुपाने छोटेखानी यशही प्राप्त झालेय.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे बोर्डवे परिसरात रस्ता कामासाठी कार्यरत या कामगारांचे काम थांबलेच. पण, गावी जायचे मार्गही बंद झाल्याने प्रशासनाने सतर्कता दाखवित बोर्डवे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे निवारा केंद्रात या कामगारांची राहण्याची व्यवस्थाही केली. मात्र, प्यायला पाणी उपलब्ध होत नसल्याने कामगारांनी शाळेच्या आवारात असलेली कोरडी विहीर खोदायला सुरुवात करत चार फुट खोल खणत नवा झरा शोधून काढला आहे.
अंगमेहनत करणारे कामगार
विजापूर येथील चौहान, राठोड अशी आडनावे असणारे हे कामगार दिवाळीच्या सुमारास सिंधुदुर्गात येतात. रस्ताकाम, खड्डे खणणे व अन्य मजुरीची कामे करून ते उदरनिर्वाह करतात. मेच्या शेवटी ते सिंधुदुर्ग सोडून पुन्हा विजापूर गाठतात. त्यापुढील दिवसांत सिंधुदुर्गात केलेल्या कामातून साठवलेल्या पैशांवर ते गुजराण करतात. त्यानुसारच हे कामगार मागील दिवाळीनंतर येथे आले हेते. या 16 जणांमध्ये सहा पुरुष, सात महिला व तीन लहान मुले आहेत.
‘लॉकडाऊन’मुळे निवारा केंद्रात
हे सर्वजण सध्या बोर्डवे परिसरात मुकादमाच्या नेतृत्वाखाली रस्त्याचे काम करत होते. त्यासाठी त्यांनी परिसरातच कुठेतरी ‘विंचवाचे बिऱहाड पाठीवर’ या म्हणीप्रमाणे आपल्या झोपडल्या उभारल्या होत्या. मात्र, काम सुरू असतानाच ‘लॉकडाऊन’ची घोषणा झाली अन् हे कामगारही जागीच ‘लॉकडाऊन’ झाले. निवारा केंद्रात त्यांना जेवणासाठी आवश्यक ते जिन्नसही पुरविण्यात आले.
निवारा मिळाला पण…
प्रशासनाने येथे त्यांची सोय केली खरी. मात्र, कामगारांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नव्हते. सुदैवाने या कामगारांकडे रस्ताकामासाठी असलेला टँकर होता. त्याद्वारे त्यांनी दोन-तीनदा कणकवलीतून आंघोळ आदीसाठी पाणीही भरून आणले. मात्र, कणकवलीत बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडूनही टँकर अडविला जात असल्याने त्यांच्या समस्येत आणखीनच भर पडली. याचवेळी कणकवली तहसीलकडूनही त्यांना पिण्यासाठी पाणी पुरविण्याचे चांगले प्रयत्न झाले.
विहीर खोदली, पाणी लागले
हे कामगार राहत असलेल्या शाळेच्या आवारात एक कोरडी विहीर आहे. पण, हे कामगार टिकाव, फावडे, घमेलं वगैरे घेऊन विहिरीत उतरले. साधारण चार फुट खोल खणल्यानंतर तेथे पाण्याचा एक छोटा झरा कार्यान्वित झाल्याचे आढळले.
विहीर खोदण्यासाठी सकारात्मकता
याबाबत माहिती मिळताच तेथे आलेल्या बॅ. नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्गचे अध्यक्ष उमेश गाळवणकर व त्यांच्या सहकाऱयांनी ग्रामस्थ, सरपंच, हायस्कूलच्या कमिटी पदाधिकाऱयांची भेट घेतली. आणखी खोदल्यास या विहिरीला चांगले पाणी लागू शकते, हे गाळवणकर यांनी निदर्शनास आणून दिले. विहीर खोदण्यासाठी आवश्यक ती आर्थिक बाब पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. त्याला काही ग्रामस्थ, सरपंच, हायस्कूल कमिटी पदाधिकाऱयांनीही सकारात्मकता दर्शविली.
..तर विहिरीला पाणी आल्यावरच निघणार!
ही विहीर शाळेच्या परिसरात असूनही कोरडी आहे. या विहिरीच्या पाण्यापासून विद्यार्थ्यांनाही वंचित राहवे लागतेय. आज आम्ही ‘लॉकडाऊन’मुळे तसे रिकामेच आहोत. त्यामुळे वेळेचा सदुपयोग व्हावा, अशी आमचीही इच्छा आहे. संबंधितांनी मान्यता दिल्यास ही विहीर पाणीमय करूनच येथून निघण्याची इच्छा या कामगारांनी व्यक्त केली.
अन् हिरमुसलेले कामगार खुलले!
अंगमेहनत करणाऱया, दिवसातून तीनवेळा जेवणाऱया या मजुरांना प्रशासनातर्फे पुरविलेले अन्नही कमी पडत असल्याची जाणीव बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष गाळवणकर यांना झाली. त्यांनी आपल्या सहकाऱयांसह तेथे धाव घेत या मजुरांना आवश्यक त्या जीवनावश्यक वस्तू पुरविल्या. याचवेळी काहीशा हिरमुसलेल्या, धास्तावलेल्या या कामगारांचे त्यांनी संस्थेच्या समुपदेशन केंद्रातर्फे समुपदेशनही केले. परिणामी उदास झालेले हे कामगारही सध्या खुलले आहेत.









