पं.स.सदस्या सौ. साक्षी रावणंग यांचे शेतकऱयांना आवाहन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
वादळी पावसामुळे चार दिवसांपूर्वी नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या बांधावर कृषी विभागातील अधिकाऱयांच्या प्रत्यक्ष पंचनाम्यांसाठी भेटी सुरू झाल्या आहेत. रत्नागिरी तालुक्यातील निवळी परिसरातही तालुका कृषी विभागाकडून प्रत्यक्ष शेतात पिकांच्या नुकसानीची पाहणी व पंचनामे करण्यात आले.
रत्नागिरी जिह्यात 15 व 16 ऑक्टोबरला वादळी वाऱयासह मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे भात व नाचणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवळी येथे तालुका स्तरावरून नुकसान भरपाई पंचनामे सुरू झाले आहेत. ग्रामसेवक कुंभार व कृषी सेवक नितीन रंजून यांनी नुकसान भरपाई पंचनामे केले. यावेळी पंचायत समिती सदस्य सौ साक्षी रावणंग, निवळी सरपंच सौ वेदिका रावणंग, उपसरपंच विलास गावडे, ग्राम पंचायत सदस्य विनायक रावणंग, सौ वर्षा रावणंग, पोलीस पाटील भालचंद्र शितप हे ही शेतकऱयांच्या प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी व पंचनामे केले.
काही ठिकाणी कापलेल्या भाताला कोंब आले आहेत तर अनेक ठिकाणी भात पीके आडवी झालेली आहेत. नुकसानीबाबत सर्वेक्षण करून नुकसान भरपाई पंचनामे करण्याचे काम तालुकाभर सुरू आहे. या नुकसान भरपाईचे पंचनामे तालुका स्तरावरून ग्राम सेवक, तलाठी, कृषी सेवक व अधिकारी यांच्याकडून शेतकऱयांच्या प्रत्यक्ष शेतात जाऊन पाहणी सुरू आहे. परंतु काही ठिकाणी शेतकयांनी भात किंवा नाचणी जेवढी हाताला आली तेवढी घरी घेऊन आले आहेत. यामुळे प्रत्यक्ष पंचनामे न झाल्यास आधार कार्ड, बँक पासबुक व सातबारा उतारा झेरॉक्स, नुकसानीचे फोटो सदर माहिती घेऊन ग्राम सेवक, तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन पंचायत समिती सदस्य सौ साक्षी रावणंग यांनी केले आहे.









