अजित आगरकर, मनिंदर सिंग, चेतन शर्मा, शिव सुंदर दास प्रमुख दावेदार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तीन राष्ट्रीय निवड समिती सदस्यांची निवड करण्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागविले होते आणि 15 नोव्हेंबर ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख होती. बीसीसीआयकडे काही नामवंत माजी खेळाडूंनी अर्ज पाठविले असून त्यांची निवड करण्याचे आव्हान मंडळासमोर असेल. अर्ज करणाऱयांत माजी वेगवान गोलंदाज अजित आगरकर व चेतन शर्मा, माजी डावखुरा स्पिनर मनिंदर सिंग, सलामीवीर शिव सुंदर दास यांचा समावेश आहे. वेळ संपण्यास चार तासांचा अवधी असताना हेच चार उमेदवार प्रमुख दावेदार असल्याचे दिसून आले.

निवड करताना विभागीय प्रतिनिधित्व देण्याची परंपरा पुढे चालू ठेवायची का, हा बीसीसीआयसमोर महत्त्वाचा मुद्दा असणार आहे. सुनील जोशी आणि हरविंदर सिंग यांना या वर्षीच्या सुरुवातीला निवड सदस्य म्हणून सामील करून घेण्यात आले आहे. त्यातून बीसीसीआयने विभागीय धोरण कायम चालू ठेवल्याचेच स्पष्ट झाले आहे. मात्र बीसीसीआयच्या सुधारित घटनेत तसा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला नसून सर्वोत्तम पाच उमेदवार निवडले जावेत, असा त्यात उल्लेख करण्यात आलेला आहे. बीसीसीआयनेही आपण विभागीय धोरण राबवित नाही आणि त्यामुळेच उमेदवार निवडीसाठी जे निकष ठेवण्यात आले आहेत, त्यात याचा उल्लेख केला नसल्याचे मंडळाने सांगितले आहे.
आगरकर व मनिंदर सिंग यांनी याआधीही अर्ज केला होता. त्यांनी पुन्हा एकदा अर्ज करणे आवश्यक आहे का, याबाबत मात्र संभ्रम आहे. लॉकडाऊनआधी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी त्यांचे अर्ज पुढेही ग्राहय़ मानले जातील, असे म्हटले होते. तरीही सुरक्षितता म्हणून आगरकर व मनिंदर यांनी पुन्हा एकदा अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला. ‘मी मागेही अर्ज केला होता. पण त्या अर्जाचा आताही विचार केला जाणार का, याबाबत बीसीसीआयने काहीच सांगितलेले नाही. त्यामुळे मी पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे,’ असे मनिंदर सिंग यांनी स्पष्ट केले. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांत अजित आगरकर यांच्याकडे सर्वाधिक आंतरराष्ट्रीय अनुभव असल्याने निवड समिती अध्यक्षपदाचे तेच प्रमुख दावेदार असल्याचे मानले जात आहे.
विभागीय धोरणाबाबतचा गोंधळ अजूनही चालू असल्याने पूर्व विभागातील उमेदवारांत अनिश्चितता निर्माण झाली आहे. बंगालचे माजी वेगवान गोलंदाज राणादेव बोस यांनीही अर्ज केला आहे. चेतन शर्मा यांनीही काही काळ बंगालचे प्रतिनिधित्व केले होते, हेही येथे लक्षात घेण्यासारखे आहे. माजी वेगवान गोलंदाज देबाशिष मोहंती हे सध्या कनिष्ठ निवड समितीचे अध्यक्ष आहेत, त्यांनाच बीसीसीआयकडून वरिष्ठ निवड समितीत बढती देण्यात येईल आणि बोस यांना कनिष्ठ निवड समितीत सामावून घेतले जाईल, असेही मानले जात आहे.
अजित आगरकर यांच्याकडे एकूण 231 (191 वनडे, 26 कसोटी, 4 टी-20) आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी तेच प्रमुख दावेदार असतील. त्यांनी पुन्हा अर्ज केला असल्याने बीसीसीआयला त्यांच्या मोठय़ा अनुभवाकडे (तीन वर्ल्ड कप, एक टी-20 वर्ल्ड कप) दुर्लक्ष करणे कठीण जाणार आहे. बीसीसीआयने विभागीय धोरणाचा अवलंब करणे सोडून दिले असल्याचे स्पष्ट केले असले तरी ते निवड समितीत एकाच विभागातील दोन सदस्य निवडण्याची शक्यता फारच कमी वाटते. दक्षिण विभागाच्या सुनील जोशी यांची (84 आंतरराष्ट्रीय सामने -15 कसोटी, 69 वनडे) एमएसके प्रसाद यांच्या जागी अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती तर मध्य विभागाचे प्रतिनिधी म्हणून गगन खोडा यांच्या जागी हरविंदर सिंग यांची निवड करण्यात आली होती. आता अर्ज करणाऱयांत जोशी यांच्यापेक्षा अधिक अनुभव असणारे उमेदवार असल्याने लोधा समितीच्या नियमावलीनुसार जोशी यांना अध्यक्षपद सोडावे लागू शकते.
मनिंदर सिंग यांना 94 (35 कसोटी व 59 वनडे) आंतरराष्ट्रीय सामन्यांचा अनुभव असून संधी मिळाल्यास सर्वोत्तम कामगिरी करण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पूर्व विभागाचे शिव सुंदर दास हे माजी सलामीवीर असून त्यांनी 23 कसोटीत 1326 धावा जमविल्या आहेत. याशिवाय ते उत्कृष्ट क्लोज इन फील्डर होते. त्यामुळे पूर्व विभागातून त्यांची निवड निश्चित मानली जात आहे. मात्र देबाशिष मोहंती आधीपासूनच बीसीसीआयच्या सेवेत असल्याने एकाच विभागातील दोन उमेदवारांना निवडले जाईल, अशी शक्यता वाटत नाही.









