उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावं लागतं. या दिवसात थंड पाणी हवं असतं. बाहेर जाताना, प्रवासादरम्यान पाण्याची बाटली सोबत न्यावी लागते. बाजारात पाण्याच्या वैविध्यपूर्ण बाटल्या मिळतात. अगदी प्लास्टिकपासून मातीच्या, बांबूच्या बाटल्याही मिळू लागल्या आहेत. यापैकी काही बाटल्या घरासाठी तर काही प्रवासादरम्यान उपयुक्त ठरू शकतात. पाण्याच्या बाटलीची निवड कशी करावी, याविषयी…
- स्टेनलेस स्टीलच्या बाटल्यांमध्ये पाणी बराच काळ थंड किंवा गरम राहतं, अशा बाटल्या प्रवासादरम्यान योग्य ठरतात.
- बाजारात ऍल्युमिनियमच्या बाटल्याही मिळतात. या बाटल्या द्रव पदार्थाला बराच काळ गरम किंवा थंड ठेऊ शकत नाहीत. या बाटल्यांमध्ये प्लास्टिकचा पातळ थर असतो. त्यामुळे या बाटल्या फार गरम पाण्याने धुताही येत नाहीत.
- तांब्याच्या भांडय़ातलं पाणी आरोग्याच्या दृष्टीने खूपच लाभदायी असतं. बाजारात तांब्याच्या बाटल्या मिळतात. मात्र त्यांचं वजन बरंच जास्त असल्यामुळे प्रवासादरम्यान योग्य ठरत नाहीत. या बाटल्या घरगुती वापरासाठी योग्य आहेत.
- मातीच्या बाटल्यांमध्ये पाणी नैसर्गिकरित्या थंड राहतं. मात्र या बाटल्यांमधून पाणी गळू शकतं. त्यामुळे अशा बाटल्याही घरगुती वापरासाठी योग्य ठरतात.
- बांबूच्या इको फ्रेंडली बाटल्या घेता येतील. शक्यतो न गळणार्या बाटल्यांची निवड करा.









