एखादं स्वप्न जगायचं ठरवलं तर अनंत अडचणींनंतरही तुमच्यासमोर संधींची कवाडं खुली होत असतात. इच्छाशक्तीच्या बळावर आपण काहीही साध्य करू शकतो. तुमचं गाव, जिल्हा आणि पार्श्वभूमीचा यशाशी काहीच संबंध नसतो. रू पाली भिसेने हे दाखवून दिलं आहे. रूपाली ही ‘शेल‘ कंपनीच्या विविध इंधन स्थानकांची जबाबदारी एकाच वेळी सांभाळणारी पहिली महिला रिटेलर ठरली आहे. इंधन आणि गॅस रिटेलिंगच्या क्षेत्रात तशी पुरुषांचीच मक्तेदारी. महिला या क्षेत्राकडे फारशा वळत नाहीत. मुळात ऑटोमोबाईलकडे वळणार्या महिलांची संख्याही खूप कमी आहे. रू पालीकडे शेलच्या दोन इंधन स्थानकांची जबाबदारी असून त्यांचं व्यवस्थापन आणि कर्मचार्यांची सुरक्षा हे सगळं तिला पाहावं लागतं. यासाठी तिला आठवडय़ातले सातही दिवस आणि 24 तास सजग रहावं लागतं. रुपालीने हे आव्हान पेललं आहे. पुरुषी मक्तेदारीच्या या क्षेत्रात ती पाय रोवून उभी आहे.
रुपाली नागपूरजवळच्या बेला गावची रहिवासी. रुपालीच्या दोन भावांना शेतीत फारसा रस नव्हता. मग तिनेच वडिलांना शेतीच्या कामात मदत करायला सुरू वात केली. इथेच तिची वाहनांशी ओळख झाली.शेतीच्या कामासाठी लागणारे ट्रक्टर तसंच अन्य उपकरणांची देखभाल ती नववीत असल्यापासूनच करू लागली. अर्थात तिला घरच्यांकडूनही पूर्ण पाठिंबा मिळाला. ट्रक्टर आणि ट्रकच्या देखभालीची जबाबदारी वडिलांनी रू पालीवर टाकली होती आणि तिने ही जबाबदारी अगदी नीट पार पाडली. शेतीशी संबंधित वाहनं आणि उपकरणांसोबत काम करता करता रू पालीला ऑटोमोबाईल क्षेत्राची भुरळ पडली.
मात्र बारावीत असताना रुपालीच्या वडिलांचं निधन झालं. यामुळे घरची आर्थिक जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. ही जबाबदारी निभावताना ऑटोमोबाईलची आवड तिला बाजूला ठेवावी लागली. रू पालीने बायोकेमिस्ट्रीमध्ये पदवी मिळवली. पुढे एमबीए केलं. तिने काही वर्षं वत्रोद्योग क्षेत्रात काम केलं. मात्र शेलच्या एका जाहिरातीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्राची कवाडं रुपालीसाठी पुन्हा खुली झाली. शेलने रिटेलर्स हवे असल्याची जाहिरात दिली होती. रू पालीने यासाठी अर्ज केला. तिला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. तिला शेलकडून कामाचं प्रशिक्षण मिळालं आणि शेलच्या देशातल्या काही मोजक्या महिला रिटेलर्समध्ये रू पालीचा समावेश झाला. रू पाली समर्थपणे सगळी जबाबदारी पार पाडते आहे. रुपालीने परिस्थितीपुढे कधीही हार मानली नाही. मिळालेली संधी तिने साधली. त्यामुळे आपण ठरवलं तर काही अशक्य नसतं हेच तिने दाखवून दिलं आहे. रुपालीने अनेकींपुढे आदर्श उभा केला आहे.









