कोरोना नियंत्रण-निवडणूक प्रक्रियेबाबत नूतन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांची ग्वाही
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ात कोरोना महामारीचे नियंत्रण व निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आपले पहिले प्राधान्य असणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे राबविण्यात येणार आहे, अशी ग्वाही नूतन जिल्हाधिकारी डॉ. के. हरिशकुमार यांनी दिली.
सोमवारी सूत्रे स्वीकारल्यानंतर सायंकाळी त्यांनी अधिकाऱयांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत बोलताना हरिशकुमार यांनी वरील ग्वाही दिली. निवडणूक आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्याबरोबरच निवडणूक आयोगाकडून वेळोवेळी येणाऱया सल्ला व सूचनांचे परिणामकारक अंमलबजावणी करण्याची सूचनाही त्यांनी अधिकाऱयांना दिली.
कोरोना नियंत्रण व निवडणुकीचे काम एकाच वेळी करायचे आहे. त्यामुळे कोणीही या कामात दुर्लक्ष करू नये. मुक्त व पारदर्शक वातावरणात निवडणूक प्रक्रिया व्हावी यासाठी अधिकाऱयांनी आपल्यावर दिलेली जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडावी. यासाठी कोणत्याही प्रकारचे सहकार्य देण्यास जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी अप्पर जिल्हाधिकारी योगेश्वर एस., एनआयसी अधिकारी संजीव क्षीरसागर, श्रीश कडगदकाई, माहिती खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर व निवडणूक विभागाचे अधिकारी बैठकीला उपस्थित होते. मंगळवारपासून प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. त्यामुळे नूतन जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना मार्गदर्शन केले.









