जिल्हाधिकारी नितेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चर्चा : एक दर निश्चित केल्यानंतर प्रत्येकाला एकच न्याय
प्रतिनिधी / बेळगाव
आगामी विधानसभा निवडणुकीच्या काळात प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध साहित्यांचा बाजारभाव निश्चित करण्यात येणार आहे. तो दर निश्चित करून निवडणूक आयोगाकडे पाठविण्याचे ठरविण्यात आले आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर याचा जमा-खर्च तपासला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीत सांगितले.
प्रचारासंदर्भातील तसेच निवडणुकीच्या इतर खर्चांबाबत प्रत्येक उमेदवाराला निवडणूक आयोगाकडे खर्च द्यावा लागतो. बऱ्याचवेळा या खर्चामध्ये तफावत असते. त्यामुळे एक दर निश्चित केल्यानंतरच प्रत्येकाला एकच न्याय दिल्याचे स्पष्ट होत आहे. निवडणूक आयोगाने याबाबत दरासंदर्भातील यादी मागितली आहे. त्यामुळेच गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पक्षांच्या पदाधिकारी व प्रतिनिधींची बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये प्रचाराला लागणाऱ्या साहित्याच्या दरांबाबत चर्चा करून दर निश्चित करण्याबाबत ठरविण्यात आले.
प्रत्येक साहित्याची यादी
साहित्याचे दर किंवा किंमत निर्धारित दरापेक्षा कमी असल्यास सदर उमेदवाराला त्याबाबतची पावती द्यावी लागणार आहे, असेही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. आचारसंहिता लागू असताना प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक साहित्याची यादी केली जाईल आणि आयोगाच्या निर्देशानुसार बाजारभाव दर ठरविला जाईल, असेदेखील सांगण्यात आले. बऱ्याचवेळा दरामध्ये चढउतार असते. त्यामुळे बाजारात उपलब्ध असलेल्या किमती व दर्जाच्या आधारे साहित्याची किंमत कमी करण्याबाबत बैठकीत सर्वानुमते निर्णय घेण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, जिल्हा पंचायतीचे मुख्य लेखापाल व निवडणूक खर्च नोडल अधिकारी परशुराम दुडगुंटी, अन्न व नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक श्रीशैल कंकणवाडी, जिल्हा नगरविकास नियोजन कक्षाचे प्रकल्प संचालक ईश्वर उळ्ळागड्डी, निवडणूक विभागाच्या तहसीलदार सारिका शेट्टी यांच्यासह राष्ट्रीय नोंदणीकृत पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.









